पुणे : आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव. हा उत्सव म्हणजे भक्ती, शक्ती आणि पराक्रम यांची उपासना. संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकाराम आदी संतांनीसुद्धा कुलदेवीच्या उपासनेचे समर्थन त्यांच्या अभंगामध्ये केले आहे. उद्यापासून (गुरुवारी) शारदीय नवरात्राला प्रारंभ होत आहे. तरी देवीच्या घटस्थापनेसाठी कुठलाही अमृत वा इतर लाभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही. सप्तशती या ग्रंथांमध्ये देवी उपासना ही प्रात:काळी करण्यात यावी, असे सांगितले आहे. त्यामुळे घटस्थापनेसाठी सूर्योदयापासून पुढील चार तास हा सर्वोत्तम काळ आहे, असे देशपांडे पंचांगकर्ते गौरवशास्त्री देशपांडे यांनी सांगितले.देशपांडे म्हणाले, की शारदीय नवरात्र संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी प्रामुख्याने महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिगुणात्मक स्वरूपातील देवींच्या विविध रूपांची म्हणजेच कुलदेवीचीच मनोभावे पूजन करण्याचा प्रयत्न करतो. या उत्सवात घटस्थापना, मालाबंधन, वेदिकापूजन, कुमारिकापूजन या विधींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्रीशक्ती नवरात्र महोत्सवाचा अविभाज्य घटक आहे, याचा दाखला आपल्याला सप्तशती किंवा देवीमाहात्म्य ग्रंथात मिळतो. त्यात दोन वर्षे ते दहा वर्षांदरम्यानच्या मुलींना कुमारिका असे संबोधले गेले आहे. यातील प्रत्येक वर्षाच्या मुलीला रोहिणी, कल्याणी, सुभद्रा अशा विविध नावांनी संबोधले जाते. कुमारिका पूजनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष आदी चारही पुरुषार्थ उत्तम प्रकारे सिद्ध होतात. या नवरात्रातील उपासना म्हणून देवीच्या नाममंत्राचा जप, दुर्गास्तोत्र, कनकधारा, अर्गला आदी स्तोत्रांचे पठण करता येते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगायचे झाले तर हे नवरात्र झोपाळा या वाहनावर आहे. हे वाहन धनधान्याच्या समृध्द्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे शेतकºयांसाठी या वर्षीचे नवरात्र फलदायी असणार आहे. तसेच घागर फुंकणे या नवरात्रातील विधीला महत्त्व आहे, असे सांगत त्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.शहरात घटस्थापनेच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. तसेच, कुटुंबासह मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरातील सारसबागेजवळचे महालक्ष्मी मंदिर, पद्मावती, तळजाई, चतु:शृंगी, भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर आदी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, होमहवन, कथासप्ताह अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरात पावसाने चांगलाच जोर पकडल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. मातीचा घट, फुले, फळे, पूजा साहित्य खरेदीसाठी शहरातील मंडई,मार्केट यार्ड आदी मध्यवर्ती भागांत नागरिकांनी गर्दी केली आहे. शहरातील वातावरण भक्तिरंगात न्हाऊन निघाले आहे.
सूर्योदयानंतर चार तासांत करा घटस्थापना, आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:51 AM