लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात गेल्या एक-दीड वर्षात आलेली दोन चक्रीवादळे, अतिवृष्टीचा मोठा फटका शाळा वर्गखोल्यांना बसला आहे. याशिवाय जुन्या व दुरुस्तीअभावी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल चारशे वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या, तरी भविष्यात अशा वर्गखोल्यांमध्ये शाळा भरविणे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोकादायक ठरू शकतात.
जिल्ह्यात बहुतेक सर्व तालुक्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. शाळांचे पत्रे फुटलेत, कौलांखालच्या लाकडी पट्ट्या खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी पट्ट्या तुटल्या आहेत. लाकडी कैची, वासे सडले आहेत. कैची वाकली आहे. छप्पर कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. फुटक्या कौलातून, पत्र्यांतून पावसाळ्यात शाळेत पाणी वाहत असते. अति पाऊस असलेल्या तालुक्यातील नव्यानेच बांधण्यात आलेले स्लॅब गळतात. खिडक्या तुटल्या आहेत.
केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोठ्याप्रमाणात शाळा वर्ग खोल्यासाठी निधी देण्यात येत होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही योजना बंद पडल्याने बांधकामासाठी अपेक्षित निधी उपलब्ध होत नाही. सध्या पुणे जिल्ह्यासाठी ७६३ नवीन वर्ग खोल्यांची गरज असून, जिल्हा नियोजन आणि जिल्हा परिषद निधीतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
---------
जिल्ह्यातील एकूण शाळा : ३६४८
जिल्हा परिषदेची एकूण विद्यार्थी संख्या : २,३३,९७७
- वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक : ७६३
--------
जिल्ह्यात तालुकानिहाय धोकादायक वर्गखोल्यांची संख्या
तालुका वर्गखोल्या
आंबेगाव ३३
बारामती १५
भोर ०५
दौंड ७७
हवेली ३०
इंदापूर ५६
जुन्नर ६९
खेड ३६
मावळ १७
मुळशी १२
पुरंदर १७
शिरूर २५
वेल्हा ०८
एकूण ४००
----------
यंदा अडीचशे नवीन वर्गखोल्यांचे काम
जिल्ह्यात तब्बल ७६३ नवीन वर्गखोल्यांची गरज आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असून, सध्या कोरोनामुळे निधी उपलब्ध होण्यास अडचण येत आहे, तरी देखील यंदा अडीचशे नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम मंजूर करण्यात आले असून, जिल्हा नियोजन आणि जिल्हा परिषद निधीतून २६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच बांधकाम सुरू होणार आहे.
चौकट
केंद्राने निधी उपलब्ध करून द्यावा
केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात शाळा वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून ही योजना बंद पडली आहे. आजही ग्रामीण भागात धोकादायक वर्गखोल्यांची संख्या मोठी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. जिल्हा नियोजन व जिल्हा परिषद निधीतून हे सर्व बांधकाम करण्यासाठी मर्यादा येतात.
- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती पुणे जिल्हा परिषद