पुणे : सध्या शहरात खुनाच्या प्रयत्नाच्या वाढत्या घटना चिंतेची बाब बनली आहे. शहरातील विविध भागांत दोन ते तीन दिवसांंमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याच्या चार घटना घडल्या आहेत. याबाबत खडकी, भारती विद्यापीठ आणि लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. खडकीत दोन टोळक्यांत एकमेकांकडे पाहण्याच्या कारणातून झालेल्या वादात कोयत्याने वार करण्यात आले. तर कात्रज बसथांब्याजवळ पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाचा खुनाचा प्रयत्न केला. कंपनीतून काढून टाकल्याच्या कारणातून दोघांनी एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला.
पूर्वीच्या भांडणातून पाच जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शुभम परदेशी याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तानाजी राजाभाऊ जाधव (वय ३५, रा. आयप्पा मंदिराजवळ, संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तानाजी यांचा भाऊ धनाजी जाधव (वय ३३, रा. संतोषनगर, कात्रज) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक घावटे करीत आहेत.
खडकी येथील संजय गांधी भाजी मंडई परिसरात दोन गटांत एकमेकांकडे पाहण्याच्या कारणातून वादावादी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना ३० जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. आफरीद सलीम शेख (वय २१, रा. इंदिरानगर वसाहत खडकी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच जणांच्या विरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुलतान ऊर्फ शाहरुख बागवान, इरफान बागवान, मोहसीन बागवान, अरबाज बागवान (राहणार सर्व दर्गा वसाहत) या चौघांना अटक करण्यात आली असून, सोहेल खान हा फरार आहे.
दरम्यान, कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला व त्याच्या मित्राला कामावरून काढून टाकल्याच्या कारणातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. विठ्ठलवाडी वाघोली येथील सिस्का कंपनीमध्ये ३० जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सागर इटकर (वय २५,रा.वाघोली) याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशील बाळू रोकडे (वय २८,रा.येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. इटकर कंपनीत लोडिंग व अनलोडिंंग हेल्पर काम करतो. इटकर व त्याच्या मित्राला कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. त्याच्याच रागातून त्याने रोकडे यांच्यावर हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न केला. हल्ल्यात त्यांच्या खांद्यावर, मानेवर व डोक्यात वार झाले आहेत.
-------------------------------------