पुणे : शहरातील स्वारगेट येथील इंदिरानगर वसाहत, बोपोडी व फुरसुंगी परिसरात दोन गटात झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याच्या चार घटना घडल्या.
याप्रकरणी स्वारगेट, हडपसर व खडकी पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गटाच्या विरोधात स्वारगेट पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या घटना खड्डा इंदिरानगर वसाहतीत शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडल्या.
सौरभ कसबे (वय २४, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार अशपाक मुन्ना शेख (वय ३६), सुलतान करीम शेख (वय २३, दोघे रा. इंदिरानगर, गुलटेकडी) यांना अटक केली असून इतर दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींची गोट्या क्षीरसागर व सैफअली बागवान यांच्याबरोबर पूर्वीच्या भांडणातून वाद सुरु होता. त्यावेळी हसन व सुलतान या दोघांनी सौरभकडे पाहून शिवीगाळ करत हा सुद्धा त्यांच्यात असतो, त्याचाही काटा काढू असे म्हणत त्याला दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करुन रेकॉर्डवरील अशपाक व सुलतान यांना अटक केली आहे.
दुसऱ्या घटनेत अशपाक मुन्ना शेख (वय ३६, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भीमराव नरसाप्पा मानपाडे (वय २०) आणि कृष्णा सुनिल क्षीरसागर (वय २०, दोघे रा. समाज मंदिर चौक, गुलटेकडी) या दोघांना अटक केली आहे.
अशपाक याचा मुलगा मोबीन याचे भिमराव व कृष्णा बरोबर एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन वादावादी झाली होती. त्यावेळी दोघांनी मोबीन याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशपाक यालाही डोक्यात सिमेंटच्या विटांनी मारहाण करुन जखमी केले होते. अशपाक याचा भाचा सुलतान शेख याला लोखंडी वस्तूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. स्वारगेट पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.