लोणी काळभोर : गुन्हे शोध पथकाने होळकरवाडी (ता. हवेली) येथील जे २ के हॉटेलमध्ये विनापरवाना हुक्का पार्लरची जाहिरात करून हुक्का पार्लरचे साहित्य विक्री करताना व बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगल्याच्या स्थितीत आढळल्याप्रकरणी हॉटेल मालकासह व्यवस्थापक व ३ वेटर विरोधात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल मालक अक्षय दिलीप जगताप (वय २९, रा. हांडेवाडी, ता. हवेली), व्यवस्थापक कुमार विलास गोफणे (वय ३०, रा. होळकरवाडी, ता. हवेली), वेटर सचिन मधुकर मोटे (वय ३३, रा.हांडेवाडी, ता. हवेली), आकाश राजू कहार (वय २४, रा. गाडीतळ, हडपसर, पुणे), गजेंद्र अशोक काटकर (वय ३१, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक आर. व्ही. महानोर, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, गायकवाड, बाराते यांनी केली आहे.
शनिवारी रात्री (दि. ६) पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांना खबऱ्यामार्फत हॉटेल जे २ के मध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लरची जाहिरात करून हुक्का विक्री करत असल्याची माहिती मिळाली. याची शहनिशा करण्यासाठी पोलिसांचे पथक या हॉटेलमध्ये गेले. तेथे त्यांना सुगंधित हुक्क्याचा वास आला. त्यांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच हुक्का पिणारे ग्राहक हॉटेलच्या दुसऱ्या दरवाज्याने अंधारात पळून गेले. पथकाने हॉटेल व आतील खोल्यांची पाहणी केली असता, तेथे हुक्क्याचे साहित्य व वरील ५ जण आढळले. खोलीमध्ये एका टेबलवर व टेबलाचे खाली हुक्क्याचे फ्लेवर्स सापडले. हॉटेल मालक अक्षय जगताप यांना हुक्का पार्लरच्या परवानगीबाबत विचारणा केली असता, त्यांनी हुक्का चालविण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. हॉटेलमधील १३ हजार ३०० रूपये किमतीचे १९ काचेचे पॉट, १९ हजार ५०० रुपये किमतीचे पानरस, ३ ज्युस मिट, १ आरएमडी, ४ सुपारी, २ मिंट, २ किवी असे वेगवेगळे १३ फ्लेवर्स, ३ हजार ८०० रुपये किमतीचे १९ रबरी पाईप, २०० रुपयांचा हुक्का कोळसा, १६० रुपये किमतीची ४ चिलम असे एकूण ३६ हजार ९६० रुपये किमतीचे हुक्का साहित्य जप्त करण्यात आले आहे.