पुणे /कोथरूड : कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीमधील एका गादी कारखान्याला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. आगीमध्ये मृत्यू झालेल्या चौघांपैकी तिघांची ओळख पटवण्यात यश आले असून, आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वेल्डिंगचे काम सुरू असताना गाद्यांवर पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे व केंद्रप्रमुख गजानन पात्रुडकर यांनी दिली. मोहंमद आझाद शेख (वय २२), मोहंमद एजाज रहमतअली शेख (वय २३, दोघेही रा. बिहार), रवी ठाकूर (वय ३५, रा. राजस्थान) अशी होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चौथ्या मृताचे तसेच जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीमध्ये असलेल्या मयूरेश डायनिंग हॉलमधील हे सर्व जण कामगार होते. मोतीलाल व्होरा ओझा यांच्या मालकीचे हे हॉटेल आहे. त्यांच्या शेजारच्या पाच गुंठे जागेमध्ये नारायण गेहलोत यांनी गादी कारखाना सुरू केला होता. या कारखान्याच्या पत्र्याच्या शेडला वेल्डिंगचे काम सुरू असतानाच सायंकाळी सहाच्या सुमारास आगीच्या ठिणग्या गाद्यांवर पडल्या. कापसाने लगेचच पेट घेतल्याने काही सेकंदांतच आगीने रौद्र रूप धारण केले. काही क्षणांतच संपूर्ण गादी कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीची माहिती मिळताच कोथरूड अग्निशामक दलाचा बंब आणि पाण्याचा टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. आगीची तीव्रता पाहून आणखी ५ बंब आणि पाण्याचे टँकर मागविण्यात आले. महापौर दत्तात्रय धनकवडे आणि सभागृह नेते बंडू केमसे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
कोथरूडमध्ये आगीत चौघांचा होरपळून मृत्यू
By admin | Published: December 17, 2015 2:23 AM