दौंड (पुणे) :दौंड परिसरात दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात चार ठार झाले असल्याची घटना घडली. दरम्यान, सोमवारी दुपारी दौंड शुगर कारखाना परिसरात झालेल्या अपघातात दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य पोपटराव खोमणे यांचे अपघाती निधन झाले आहे. तर दौंड-पाटस रोडवर रविवारी रात्री झालेल्या अपघातात काष्टी (ता. श्रीगोंदा) तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हृषीकेश महादेव मोरे (वय २६), स्वप्नील सतीश मनुचार्य (वय २४), गणेश बापू शिंदे (वय २६, तिघेही रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नाव आहे.
तिघे युवक रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाटस येथून काष्टीकडे दुचाकीवरून (क्र. एमएच १६ बीपी ९२८०) निघाले होते. दरम्यान, पुढे चालत असलेल्या उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीचा वेग (ट्रॅक्टर क्र. एमएच ४२ वाय २९४३) ट्रॉली (ट्रॉली क्र. एमएच ४२ एफ ६१५१) अचानक कमी झाल्याने या ट्रॉलीच्या पाठीमागील भागास दुचाकी धडकली. यावेळी ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसवलेला नव्हता. त्यामुळे रात्रीच्या अंधारात दुचाकी पुढे चाललेले ट्रॅक्टर दुचाकी चालकास दिसले नसल्याने हा अपघात झाला.
ट्रॅक्टर चालविण्याच्या चुकीमुळे अपघात-
अपघाताचे स्वरूप भयानक असल्यामुळे यावेळी मोठा आवाज झाला. यावेळी रस्त्यावरील वाहनचालक अपघातग्रस्त यांच्या मदतीला धावून आले. अपघातातील तिन्ही जखमींना तातडीने दौंड येथील रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वी त्यांच्या मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक विशाल निवृत्ती दिवेकर (रा. वरवंड, ता. दौंड) याच्या ट्रॅक्टर चालविण्याच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिणामी, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रॅक्टर चालक फरार आहे.
अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक फरार-
अन्य दुसऱ्या एका अपघातात पंचायत समितीचे माजी सदस्य पोपटराव खोमणे (वय ६७, रा. खोरवडी, ता. दौंड) यांचे अपघाती निधन झाले. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोपटराव खोमणे हे दौंड शुगर कारखान्याकडून आलेगावकडे निघाले होते. दरम्यान, आलेगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पोपटराव खोमणे जागीच ठार झाले. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक पळून गेला. पोपटराव खोमणे हे दौंड तालुक्यातील खोरवडी गावचे रहिवासी असून, या गावचे ते पंधरा वर्षे सरपंच होते. लिंगाळी गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते.