मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: नामदेव रामभाऊ शिंदे (सध्या रा. मंचर) यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या मुलीचे शिक्षण एम.ई. झाले असल्याने ते व तिच्या घरातील लोक मुलीसाठी नोकरी शोधत होते. नोकरीसंदर्भात नोव्हेंबर 2018 मध्ये मेहुणे यांच्या ओळखीचे रणपिसे यांच्या माध्यमातून शिंदे यांची नूरजहाँ बाबासाहेब मुलाणी (रा. किवळे) हिच्याशी ओळख झाली. मुलाणी हिने मी गरजू लोकांना रेल्वे ,मंत्रालय, याठिकाणी नोकरीला लावते. तसेच बँकांमधून कर्जप्रकरणे करून देते. माझे मंत्रालयातील मंत्री, अधिकारी, कंपनीचे मॅनेजर यांच्याबरोबर ओळख असून तुमच्या मुलीला रेल्वेत नोकरीला लावते, असे सांगितले. त्यानंतर नूरजहाॅं मुलांनी या फिर्यादीच्या वेळोवेळी संपर्कात राहून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. तुमच्या मुलीच्या नोकरीसाठी 4 लाख रुपये खर्च येईल तो तुम्हाला द्यावा लागेल. असे नूरजहाॅं यांनी फिर्यादी शिंदे यांच्या मेहुण्याच्या गावडेवाडी येथे राहत्या घरी येऊन सांगितले. त्यावेळी तिच्या बरोबर गिरीश बंडू मुसळे (रा. किवळे) हा इसम देखील होता. त्यानेदेखील आम्ही खूप लोकांना नोकरीला लावले असल्याचे सांगितले. त्या दोघांवर विश्वास ठेवून फिर्यादी शिंदे यांनी दि.17 डिसेंबर 2018 रोजी रुपये 2 लाख व 18 डिसेंबर2018 रोजी 1 लाख, 29 डिसेंबर2018 रोजी 50 हजार व 8 जानेवारी2019 रोजी 50 हजार असे मिळून 4 लाख रुपये आरटीजीएस द्वारे नूरजहाँ मुलाणी हिच्या बँकेच्या खात्यावर पाठविले. त्यानंतर फिर्यादी शिंदे यांनी मुलाणी यांना वारंवार फोन करून नोकरीसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता ते त्या ठिकाणी राहत नसल्याचे समजले. त्यानंतर शिंदे यांनी दिलेल्या पैशाची मागणी मुसळे यांच्याकडे केली असता त्यांनीही पैसे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नामदेव शिंदे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे करत आहे.
रेल्वेमध्ये नोकरीला लावतो म्हणून चार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:08 AM