पुणे : आर्मी अधिकारी असल्याचे सांगत विश्रांतवाडी परिसरात फ्लॅट भाड्याने पाहिजे असल्याचे सांगत ३३ वर्षीय महिलेला ३ लाख ६९ हजार ५२७ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने विश्रांतवाडी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ ते १६ मे या कालावधीत घडला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहा अंकुश म्हस्के (३३, रा. विश्रांतवाडी) यांच्या मोबाइलवर एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून (९६६८८९०८५९) फोन आला. यावेळी समोरील व्यक्तीने स्वत:ला आर्मीचा अधिकारी असल्याचे सांगत फ्लॅट भाड्याने पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर समोरील व्यक्तीने नेहा म्हस्के यांच्या मोबाइलवर ऑनलाइन काही रक्कम पाठवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भामट्याने म्हस्के यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांच्या खात्यावरून ३ लाख ६९ हजार ५२७ रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ढवळे करत आहेत.