सासवड : भिवडीजवळील मोकाशीवस्ती येथे दरोडा टाकून लीलाबाई मोकाशी यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली होती. आता आणखी चार आरोपींना अटक केली आहे. या चौघांना न्यायालयाने २६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. विजय ऊर्फ गदू मेजर भोसले (वय २५ ), भाग्यश्री विजय भोसले (वय २५) , स्वप्नाली सिद्धिक भोसले (वय २०) तिघेही रा. मोकाशीवस्ती भिवडी आणि पद्मिनी शोभराज भोसले (वय ३०, रा. कोंढवा, गोकूळनगर, पुणे) अशी त्या चौघांची नावे आहेत. यापूर्वी सिद्धू भोसले (वय १९) व शोभराज ऊर्फ हाटेल्या ऊर्फ वटेल्या यांना प्रथम अटक केली होती. या खुनाच्या कटात कुटुंबाचा सहभाग असल्याचे निश्चित झाले असून, त्यांनी गुन्हाही केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे सर्व गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले असून, आता त्यांनी घटनेवेळी चोरून नेलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने हस्तगत करण्याचे प्रमुख काम राहिले आहे. त्याचप्रमाणे हे दागिने कोणाकडे ठेवले की एखाद्या सोनाराला विकले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. त्यामुळे एखादा सोनार हाती लागल्यास, त्या सोनाराकडूनसुद्धा अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
भिवडी दरोडाप्रकरणी आणखी चौघांना अटक
By admin | Published: October 21, 2015 12:48 AM