पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत चाललेला आकडा पाहता प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. अलगीकरण तसेच बाधित रुग्णांसाठी खाटांची सुविधा वाढविण्यास सुरुवात केली आहे. शहरात आणखी चार ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली जाणार आहेत.
गेल्या वर्षी मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख खाली गेला होता. जानेवारीमध्ये दिवसाकाठी १०० ते १५० रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून अचानक रुग्णवाढ सुरु झाली. मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात हा आकडा दिवसाला दोन हजार रुग्ण इथपर्यंत पोचला आहे.
खासगी रुग्णालयातील आरक्षित खाटा उपलब्ध होत नाहीयेत. बाधित नागरिकांना घरामध्ये अलगीकरणात राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांच्यासाठी खाटांची उपलब्धता करणे आवश्यक आहे. पालिकेने रक्षकनगर येथील २०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. तसेच आता बाणेर येथे नंदन अॅक्युरा (३०० खाटा), हडपसरमधील बनकर शाळा (३०० खाटा), खराडी येथील पठारे स्टेडीयम (३०० खाटा) तर येरवडा येथील संत ज्ञानेश्वर हॉस्टेल (३५० खाटा) तयार ठेवणार आहेत. त्यासाठीची जबाबदारी संबधित क्षेत्रीय कार्यालयांवर दिली असून त्यासाठी आवश्यक असलेले साहित्य भवन विभागाकडून घेतले जाणार आहे. या ठिकाणी स्वच्छता व्यवस्था, कर्मचारी तसेच इतर सुविधा तातडीनं उभारण्याचे आदेश दिले आहेत.