पुणे : विश्रामबागवाड्यासमोर पथारी लावण्याच्या कारणावरून व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादातून तिघांचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आणि चाकूने वार करून खून करणाऱ्या एका कुटुंबातील तिघांसह चौघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला आहे. दत्तात्रय रामचंद्र तांबडे (वय ५५), त्यांची मुले सागर (वय २४) व घनश्याम (वय २२) आणि विनायक माधव चव्हाण (चौघेही रा. सदाशिव पेठ ) अशी जन्मठेप झालेल्या चौघांची नावे आहेत. सचिन कुडले, कैलास चव्हाण आणि सागर लहरे अशी खून झालेल्या तिघांची नावे आहेत. ही घटना विश्रामबागवाड्यासमोर १६ जुलै २०१२ रोजी दुपारी १२़३०च्या सुमारास घडली होती. या खटल्यात प्रमुख जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी १० साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी फिर्यादी शीतल संतोष कुडले (वय २९, रा. रविवार पेठ) आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल संध्या काळे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना दोषी ठरून जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)
तिहेरी खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप
By admin | Published: March 31, 2017 3:22 AM