पिंपरी: बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार पिस्तूल व चार जिवंत काडतुसे, असा एक लाख २२ हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. आळंदी पोलिसांनी ही कारवाई केली.
सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय २७, रा. सोळू, ता. खेड), असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकातील पोलीस कर्मचारी बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खेडकर हे गस्तीवर होते.
आरोपी सोमनाथ पाटोळे हा सोळू गावात आला असून, तो पिस्तूल विक्रीचा व्यवसाय करीत आहे, अशी माहिती फिर्यादी खेडकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून गुरुवारी (दि. ७) सोळू गावातील आळंदी ते मरकळ रोडवरील दर्ग्याजवळ सापळा लावून सोमनाथ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख २२ हजार रुपये किमतीची चार पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी सोमनाथ याने हे पिस्टल विक्रीसाठी आणले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
आरोपी सोमनाथ याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस उपनिरीक्षक ए. एन. गांगड तपास करीत आहेत. आरोपी सोमनाथ पाटोळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्याच्या तडीपारीचा कालावधी जानेवारीमध्ये पूर्ण झाला. त्यानंतर तो खेड तालुक्यातील साळू येथे आला होता. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस हवालदार आर. एम. लोणकर, पोलीस नाईक बी. बी. सानप, पोलीस कर्मचारी बाळासाहेब खेडकर, एन. के. साळुंखे, के. सी. गर्जे, जी. व्ही. आढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.