पुणे : कोपरगाव येथून येऊन पुणे, दौंड आणि अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनमध्ये लांब पल्यांच्या गाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या चौघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून पुण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले असून १ लाख ३४ हजार रुपयांचे १७ मोबाईल व सोनसाखळी हस्तगत केली आहे़ अहमदनगर, दौंड रेल्वे पोलीस ठाण्यातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ विकी बबनराव लांडगे (वय २९, रा. मुकुंदवाडी, जि. औरंगाबाद), राहुल राजू शिंदे (वय १९ रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), अशोक बाबू लहाने (वय २२, रा़ शिंदेमळा, सावेडी, जि. अहमदनगर) आणि दीपक भगवान खाजेकर (वय ३०, रा़ हारेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदगनर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत दिलखुशकुमार महेश पासवान (वय २२, रा. बिहार) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार दानापूर -पुणे एक्सप्रेसमधील बोगीमध्ये ८ आॅगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ५५मिनिटांनी घडला होता़ पासवान प्रवास करून रेल्वेतून उतरत असताना झालेल्या गर्दीदा फायदा घेऊन त्याचा १० हजार रुपयांचा मोबाईल लांबविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथून येऊन काही जण मोबाईल आणि बॅग चोरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा लोहमागचे पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पुणे ते हावडा एक्सप्रेसच्या जनरल डब्यात सापळा रचून पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे तपास करून पुणे रेल्वे स्टेशन येथे घडलेले तीन गुन्हे उघडकीस आणले. १७ मोबाईल, ५ ग्रॅमची सोनसाखळी असा १ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला. अहमदनगर आणि दौंड येथे घडलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, पोलीस उपनिरीक्षक बबन गायकवाड, पोलीस हवालदार अनिल दांगट, पोलीस नाईक अमरदीप साळुंके, संतोष चांदणे, जर्नादन गर्जे, पोलीस कर्मचारी नीलेश बिडकर, राजेश कोकाटे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, पवन बोराटे, संदीप पवार, भिसे, गाडे, चालक हवालदार जगदीश सावंत आणि खोत यांनी ही कारवाई केली़