पुणे : वाघ म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात धडकी भरते, परंतु, या सुंदर आणि रूबाबदार प्राण्याला पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. सध्या स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात हे चार बछडे पर्यटकांचे आकर्षण ठरले असून, ते नऊ महिन्यांचे झाले आहेत. त्यांना पाहण्यासाठी पुणेकर चांगली गर्दी करू लागले आहेत. हे चारही बछडे एकमेकांसोबत चांगलीच मस्ती करताना दिसून येतात. स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील रिद्धी वाघिणीने कोजागिरी पौर्णिमेला (२३ ऑक्टोबर २०१८) चार बछड्यांना जन्म दिला होता. यात एक मादी आणि तीन नर असे चार बछडे आहेत. त्यांचे नामकरणही महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत केले होते. या बछड्यांना आकाश, सार्थक, गुरू आणि पौर्णिमा अशी नावे दिली आहेत. हे बछडे आता नऊ महिन्यांचे झाले आहेत.
लवकरच दिसेल पांढऱ्या वाघाची जोडी प्राणिसंग्रहालयातील पट्टेरी वाघ (रॉयल बंगाल टायगर) पर्यटकांच्या आवडीचा विषय आहे. बागीराम व रिद्धी या जोडप्यातील वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यातील अपंग असलेल्या एकाचा मृत्यू झाला होता. आगामी वर्षात दोन वाघ देऊन त्या बदल्यात पांढºया वाघाची जोडी आणण्याचे नियोजन प्राणिसंग्रहालयाचे आहे. दिवसातून तीन वेळा खुराक या चारही बछड्यांना दिवसातून तीन वेळा खायला दिले जाते. त्यामध्ये सकाळी दुध आणि दोन किलो खिमा, त्यानंतर दुपारी चिकन, मटन आणि सायंकाळी साडेपाच वाजता खिमा मटन देण्यात येते. त्यामुळे हे बछडे सध्या गुटगुटीत दिसत आहेत. या बछड्यांची काळजी घेण्याचे काम दत्ता भगवान चांदणे हे घेत आहेत.
सकाळी उठल्यापासून बछड्यांच्या खाण्याकडे लक्ष द्यावे लागते. त्यांना सकाळी ११ ते १.३० दरम्यान नागरिकांना पाहण्यासाठी बछडे सोडले जातात. त्यानंतर दुपारच्या जेवणाला परत पिंजºयात ठेवले जाते. परत ३ ते साडेपाच दरम्यान नागरिकांना पाहण्यासाठी ते उपलब्ध असतात. सध्या प्राणिसंग्रहालयात हे वाघच लोकांचे आकर्षण बनले आहेत. सध्या येथे लहान-मोठे एकूण ९ वाघ आहेत. लहान असताना मी त्यांना हातात धरून खेळवले आहे. परंतु, आता ते मोठे झाले आहेत. त्यांना लांबूनच जेवण द्यावे लागते. या चारही बछड्यांना माझी सवय असल्याने ते माझे ऐकत असतात. त्यांच्यासोबत एक प्रकारचा आनंद आणि समाधानही मिळते.- दत्ता भगवान चांदणे, केअरटेकर