उरुळी कांचन : पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथील होले कॉम्प्लेक्स समोर चार वाहनांच्या अपघातात कंटेनरचा चालक विकास सुरेंद्र (वय ३५ वर्षे) रा.रायपुर छत्तीसगढ याचा जागीच मृत्यू झाला.तर वाहानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे होले कॉम्प्लेक्स समोर हायवेवर मधल्या डिव्हायडर शेजारी एक डंपर निकामी झाला होता. त्यांनंतर तीन वाजण्याच्या सुमारास कंटेनर चालकाला उभा असलेला डंपरचा अंदाज न आल्याने अपघात झाला. व नंतर पहाटे ४ वाजुन २० मिंटानी कंटेनरला दुसऱ्या कंटेनरचा अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. व या कंटेनर मधुन लोखंडी रोल व लोखंडी प्लेटा महामार्गावर पडल्या सुदैवाने लोखंडी रोल, लोखंडी प्लेटामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही व मोठा अपघात टळला.
पुढील कंटेनर डिव्हायडर वरून विरुध्द दिशेला जाऊन सुपर बॅटरी दुकानासमोर उभ्या असलेल्या चारचाकीवर जाऊन आदळला. यात चारचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघात झालेल्या ठिकाणापासुन पाच मिनिटाच्या अंतरावर लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत उरुळी कांचन पोलीस दुरक्षेत्र असून तरीही पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी नसल्याने तब्बल एक तास या अपघात ग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी वाहने व वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे पोलिसांकडून तत्काळ मदत मिळाली नसल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.व स्थानिक नागरिक कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांना अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकाला बाहेर काढून उपचारासाठी पाठले.