नसरापूर : भोर तालुक्यातील वरवे (ता. भोर) गावच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गावर दोन कंटेनर , एक शिवशाही व आराम बस यांच्या झालेल्या चित्रविचित्र अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये शिवशाही बस मधील एका नऊ वर्षीय मुलीचा समावेश आहे. ऋतुजा रवींद्र चव्हाण वय ९ रा. खडकमाळ, उत्तमनगर व खाजगी बसचा चालक शिवराज कुमार एच आर रा. होसैहळ्ळी कर्नाटक या दोघांचा या अपघातातमृत्यू झाला आहे. आठ जण जखमी झाले आहेत. या विचित्र अपघातात सुनंदा रवींद्र चव्हाण (वय ४२ खडकमाळ, उत्तमनगर), रत्ना रवींद्र पुजारी (वय ३८), रवींद्र रामा पुजारी( वय ४१ ) ( दोघेही रा. ठाणे मुंबई ), विना प्रभाकर गौडा (वय ३४), ज्योती जयराम गौडा (वय ३९),पर्वतमा देवे गौडा (वय ४२), हेमा अण्णा गौडा (वय ३५) सर्व रा. मुंबई ,मिनाक्षी मायशेट्टी गौडा (वय ३५),संजु रवी गौडा(वय २४), प्रदीप नज्जाप्पा गौडा (वय २५) अशी जखमींची नावे असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या जखमींना नसरापूर, कापूरव्होळ व शिवापूर येथे उपचारासाठी महामार्ग पोलिसांनी दाखल केले आहे.
याप्रकरणी महामार्ग मदत पोलीस केंद्राचे पोलीस अधिकारी असलम खतीब यांनी दिलेल्या माहिती नुसार, आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर वरवे (ता. भोर) येथे रविवारी घटना घडली आहे. वरवे गावच्या हद्दीत हॉटेल सह्याद्रीच्या समोर कर्नाटकातून खासगी बस ही म्हैसूर कडून मुबंईकडे जात असताना नास्ता करण्यासाठी वळत असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने खासगी बसला मागून जोरदार धडक दिली. लक्झरी बस महामार्गावर जागीच पलटी झाली. हा कंटेनर दुसऱ्या बाजूला म्हणजे साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवर गेला. त्यामुळे पुण्याकडून सांगलीला जाणारी शिवशाही बस ही अनियंत्रित झाल्याने ती अपघातग्रस्त झाली व त्याच वेळी पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक हा सुद्धा अपघातग्रस्त झाला आहे. अपघात होताच महामार्ग व राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन क्रेन च्या साह्याने अपघातातील वाहने बाजूला करून जखमींना पाच रुग्णवाहिका मधुन जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताने वाहतूक कोंडी झाली होती तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत झाली. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. जखमीवर नसरापूर, शिवापूर व कापुरव्होळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात लक्झरी चालक शिवराज कुमारचा जागीच मृत्यू झाला. तर धडक दिलेला कंटेनर हा सातारा बाजूकडे जाणाऱ्या दिशेने महामार्गावर घुसला. व पुणे बाजूकडून येणाऱ्या कंटेनरला धडकला व तो कंटेनर शेजारून जाणाऱ्या शिवशाही बसला धडकला. व शिवशाही बस मधील नऊ वयाची मुलगी क्रुतुजा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली.