धायरी : महापालिकेच्यावतीने धायरी गाव ते धायरी फाटा दरम्यान रस्त्याच्यामध्ये बसविण्यात आलेल्या लोखंडी दुभाजकाला चारचाकी वाहनाची धडक बसल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यामधे कोणाला मोठी दुखापत झाली नाही. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या परिसरात दुभाजकाला धडकून आत्तापर्यंत १५ ते १६ अपघात झाले आहेत.
महापालिकेच्या वतीने धायरी गाव ते धायरी फाटा दरम्यान रस्त्याच्या मध्ये लोखंडी दुभाजक बसविण्यात आले आहेत. मात्र रस्ता अरूंद असल्याने एका बाजूच्या रस्त्याला ओव्हरटेक करीत असताना रात्रीच्या वेळेला वाहनाच्या उजेडात दुभाजक व्यवस्थित दिसत नसल्याने आत्तापर्यंत १५ ते १६ अपघात या परिसरात घडले आहेत.
स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेकडे तक्रार करूनही महापालिकेने याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसून येते आहे. शिवसेना विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.
अपघात होऊन निम्मे दुभाजक गायब...या परिसरात दुभाजकाला धडकून सतत अपघात होत असल्याने काही दुभाजक निघून पडल्याने गायब झाले आहेत. तर काही ठिकाणी असलेले दुभाजक काढून टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत.