दावडी : खरपुडी (ता. खेड) येथे चालत्या चारचाकी गाडीचा अचानक टायर फुटल्यामुळे चारचाकी थेट भीमा नदीच्या पुलावरून पाण्यात पडल्याची घटना सोमवारी (दि. २४) घडली. एका नागरिकाने तत्काळ गाडीची काच फोडून चालकाला बाहेर काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. संतोष गाजरे (रा. तळेगाव, ता. मावळ ) असे चारचाकी चालकाचे नाव आहे.
खरपुडी खुर्दे ते खरपुडी बुद्रूक या दोन गावांना जोडणारा भीमा नदीवर पूल आहे. सोमवारी संतोष गाजरे हे सेझ प्रकल्प येथे कामासाठी त्यांची चारचाकी गाडी घेऊन जात होते. दरम्यान सकाळी आठ वाजता भीमा नदी पुलावर आल्यानंतर चारचाकीचा पुढच्या बाजूचा एक टायर अचानक फुटला. यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाचे ३ सिंमेट कठडे तोडून थेट नदीत कोसळली. दरम्यान मोठा आवाज झाला. खरपुडी येथील शेतकरी किसन गाडे नदीकाठ लगत शेतात गवत कापीत होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी आले. गाडीत पाणी शिरल्यामुळे चालक गाजरे यांना दरवाजा उघडता आला नाही. चार मिनिटे ते पाण्यात होते. गाडे यांनी क्षणांचाही विलंब करता प्रसंगावधान राखत गाडीची काच फोडली. तर येथील नागरिकांनी दरवाजा ओढून गाजरे यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले होते. अजून काही काळ गेला असता तर जीव गेला असता. मात्र, किसन गाडे हे देवासारखे धावून आल्यामुळे माझा जीव वाचला अशी प्रतिक्रिया संतोष गाजरे यांनी दिली.
घटनास्थळी पोलीस हवालदार सुदाम घोडे यांनी जाऊन पंचनामा करून नदीत पडलेली चारचाकी क्रेनच्या मदतीने बाहेर काढली.
फोटो ओळ : खरपुडी (ता. खेड) येथे भीमा नदीत कोसळलेली चारचाकी गाडी.