पुणे : हेल्मेट न घातल्याचा दंड पुणे वाहतूक पाेलिसांनी एका चारचाकी चालकाला केला आहे. त्यामुळे चारचाकी चालकाला मनस्तापाला सामाेरे जावे लागले आहे. अशा प्रकारच्या घटना यापूर्वी देखील अनेकवेळा घडल्या असून यामुळे वाहतूक शाखेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समाेर आला आहे.
नितीन पासलकर यांच्या बहिणीच्या नावावर असलेल्या चारचाकीवर हेल्मेट न घातल्याचा दंड असल्याचा मेसेज 17 ऑगस्ट राेजी आला. त्यावरुन त्यांनी पुराव्याचा फाेटाे पाहिला असता त्यात एका दुचाकीचालकाचा फाेटाे हाेता. यामुळे चक्रावून गेल्याने पासलकर यांनी दाेन ते तीन पाेलीस स्टेशनशी संपर्क केला. परंतु त्यांना वाहतूक शाखेशी संपर्क करण्यास सांगिण्यात आले. त्यामुळे नियम ताेडलेलाच नसताना पासलकर यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पुणे वाहतूक पाेलिसांकडून सीसीटिव्हीच्या माध्यमातून नियम माेडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नियम माेडणाऱ्यांना त्यांच्या माेबाईलवर नियम माेडल्याचे चलन पाठविण्यात येत आहे. त्यात कुठे नियम माेडला याचा फाेटाे देखील देण्यात येताे. पासलकर यांना 17 ऑगस्ट राेजी हेल्मेट न घातल्याबद्दल त्यांच्या चारचाकीला दंड ठाेठावण्यात आला हाेता. जेव्हा त्यांनी चलनातील फाेटाे पाहीला तर ताे एका दुचाकीचा हाेता. पासलकर यांच्या गाडीचा क्रमांक आणि दुचाकीचा क्रमांक MH 12 PV 0096 असा आहे. तर ज्या दुचाकीला दंड केला आहे तिचा क्रमाक MH 12 PV 096 असा आहे. वाहतूक पाेलिसांकडून चलन करताना एक शून्य अधिक टाकल्याने हेल्मेट न घातल्याचे चलन दुचाकीऐवजी चारचाकी चालकाला गेले.
यापूर्वी देखील असे अनेक प्रकार घडल्याचे समाेर आले आहे. अनेकदा हेल्मेट न घातल्याचा दंड चारचाकी चालकांना ठाेठावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना मनस्तापाला सामाेरे जावे लागले आहे.