सोमेश्वरनगर (पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांना कारखान्याने दिलेल्या चारचाकी गाड्या जमा करण्यात आल्या आहेत. गेल्या आठ वर्षांपासून पुरुषोत्तम जगताप यांनी अध्यक्ष या नात्याने कारखान्याच्या विविध कामांसाठी गाडी वापरली. मात्र काटकसरीचे धोरण अवलंबत जगताप व होळकर यांनी गाड्या परत केल्या आहेत. तसेच गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जुने गेस्ट हाऊसही बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
कारखान्याचे विस्तारीकरण झाल्याने कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. तसेच आता डिस्टिलरी व सहवीज प्रकल्पाचे विस्तारीकरण होणार आहे. यामुळे काटकसर म्हणून आतापासूनच संचालक मंडळाने काटकसर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी स्वतःपासूनच काटकसरीचा निर्णय घेत तातडीने वाहन परत केले. यापुढे ते आता स्वतःचे वाहन वापरणार आहेत.
सोमेश्वर कारखान्यात आजपर्यंत सर्वाधिक वाहनखर्च उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांच्या कार्यकाळात झाला असल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे. याबाबत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी याचे खंडन केले आहे; तर माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गीते यांनी एकदाही वाहन वापरले नसल्याची नोंद त्यांच्या नावावर आहे. सन २००७ ते २०१४ कार्यकाळात उपाध्यक्ष सुनील भगत यांच्यापासून उपाध्यक्षांना चारचाकी वाहन देण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत सात उपाध्यक्षांनी कारखान्याचे वाहन वापरले.
या व्यतिरिक्त गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत या वर्षी करार करूनदेखील ऊसतोडीसाठी अजून १० टक्के यंत्रणा आली नसून जादा पावसामुळे हार्वेस्टर बंद आहेत. त्यामुळे ऊसतोडीचे नियोजन, तसेच या वर्षी अनेक ऊसतोड यंत्रणा कामावर आल्या नसल्याने वाहतूकदारांच्या पैशांबाबत काय करता येईल, त्याबाबत चर्चा करण्यात आली.
एक-दोन प्रवास वगळता उपाध्यक्षांची गाडी ही कारखान्याच्या कामानिमित्त फिरली आहे. मी गाडी जमा केल्यानंतर गुरुवारी त्यांचा फोन आला की मीदेखील गाडी जमा करत आहे. तसेच गेस्ट हाऊसदेखील बंद करण्यात आले आहे. तसेच कारखान्याचे नवीन प्रकल्प उभारत असल्याने खर्च व कर्ज वाढणार आहे. त्यामुळे आतापासूनच काटकसर करणे गरजेचे आहे. त्याला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना
काटकसर आणि बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. उघड दिसणारे गाड्या आणि गेस्ट हाऊस हे दोन खर्च संचालक मंडळाने कमी केले आहेत; तर उपाध्यक्षांच्या गाडीबाबत झालेला खर्च हा रेग्युलर खर्च आहे.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक