लोणी काळभोर : पोलीस सह आयुक्त कार्यालयाचा शस्त्रे बाळगण्यास बंदी हा आदेश भंग केल्याप्रकरणी चार तरूणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक तलवार व तीन कोयते जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे.
अजय रामचंद्र ठवरे ( वय २१ वर्ष, रा. पुरंदर सोसायटी, उरुळी कांचन, ता.हवेली ), युवराज दत्तात्रय डोंगरे ( वय-२४, रा. भिमनगर, थेऊर, ता. हवेली ), अक्षय विजय साबळे वय २२ वर्षे,रा विश्वदीप तरून मंडळाजवळ,१३ ताडीवाला रोड,पुणे स्टेशन,पुणे व करण बाळू पांढरे ( वय २१, रा खंडोबा मंदिर देवाची उरुळी ता हवेली ) यांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ८ - ३० वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन बाजार मैदानाजवळ अजय ठवरेला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जवळून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. रात्री ११ - ४० वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत अक्षय साबळेला लोखंडी कोयत्यासहीत अटक करण्यात आली.
त्यानंतर गुरुवार रात्री ११ - ३० वाजण्याच्या सुमारांस युवराज डोंगरे याला थेऊर गावातून लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक उरुळी देवाची हददीत गस्त घालत असताना त्यांना करण पांढरे हा पालखी रोडवर बिग मार्ट दुकानाजवळ संशयितरित्या थांबलेला होता. पोलीसांना पहाताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करुन ताब्यात घेतले व अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ कोयता मिळून आला आहे.