- लोकमत न्यूज नेटवर्कनिमगाव केतकी : पहाटे व्यायामाला जाताना इंदापूर-बारामती राज्य महामार्गांवर निमगाव केतकीत (ता. इंदापूर) भरधाव वेगाने इंदापूरहून बारामतीच्या दिशेने निघालेल्या मालट्रकने व्यायाम करणाऱ्या चार युवकांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात प्रताप प्रल्हाद बंडगर याचा मृत्यू झाला. यातील तीन जण जखमी झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील प्रताप प्रल्हाद बंडगर (वय ३२), मनोज बापूराव बंडगर (वय ३२), अमित शरद चिखले (वय ३०), ओंकार बंडू स्वामी (वय २५ सर्व रा. केतकेश्वर चौक, निमगाव केतकी, ता. इंदापूर) हे चार युवक सोमवारी (दि. १२) चालण्याचा व्यायाम करण्यासाठी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास इंदापूर रस्त्यावरून चालत बारामतीच्या दिशेने निघाले होते. या वेळी पाठीमागून माल ट्रक भरधाव वेगाने येवून चौघांना जोराची धडक दिली. त्यात प्रताप याच्या पोटावरुन चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. यापैकी मनोज बंडगर याच्या हाताला दुखापत झाली आहे. तर ओंकार स्वामी जखमी झाला आहे. तर अमित चिखले गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अकलूज येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे.आमदार दत्तात्रय भरणे यांनी जखमींची रुग्णालयात जाउन विचारपुस केली. या वेळी राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा रेहाना मुलाणी, संदिप भोंग, कपिल हेगडे, अक्षय चिखले, बंडु स्वामी, बाळु बंडगर, मारुती जाधव, धनंजय राऊत उपस्थित होते.
चार युवकांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू
By admin | Published: June 15, 2017 4:47 AM