ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 : गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांनी सलग दुसरी कारवाई करीत तब्बल चौदा लाखांचे चरस जप्त केले असून एकूण पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका माजी लष्करी जवानाचा समावेश असून आरोपींनी विशाखापट्टणमहून चरस आणल्याचे तपासात समोर आल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. समाधान दत्तु गोरे (वय २५, रा. महीम , ता. सांगोला अहमदर नगर), आसाराम गणपत गोपाळघरे (वय २८, रा. नागोबाची वाडी, पोष्ट खर्डा, ता. जामखेड, अहमदनगर), वैजनाथ रामा सांगळे (वय २९, रा. आनंदवाडी, ता. जामखेड, अहमदर नगर), भास्कर दत्तू गोपाळघरे (वय २७, रा. नागोबाची वाडी, ता. जामखेड, अहमद नगर, फिरोज इकबाल पंजाबी (वय ३७ रा. जामखेड, जि. अहमद नगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील आसाराम हा माजी लष्करी जवान आहे. त्याच्यावर भ्रष्टाराचाराचे आरोप झाल्यानंतर त्याला निलंबीत करण्यात आले होते. तर गोरे हा तस्कर असून त्यानेच हे चरस विशाखापट्टणम येथून आणल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेचे शैलेश जगताप यांना आरोपी नगर रस्ता परिसरातील फिनिक्स मॉलजवळ मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त पी. आर. पाटील व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास सापळा लावण्यात आला. मोटारीमधून आलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ३ किलो ४५० ग्रॅम वजनाचे चरस मिळून आले. त्याची बाजारातील किंमत १३ लाख ८० हजार रुपये असून पोलिसांनी मोटारीसह एकूण 19 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींसह मुद्देमाल पुढील तपासासाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, यशवंत आंब्रे, शैलेश जगताप, राहुल घाडगे, हरिभाऊ रणपिसे, विनायक जोोरकर, अजय भोसले, निलेश पाटील, महेश कदम, संतोष पागार, गायकवाड, विनोद साळुंके, परवेज जमादार, मल्लिकार्जुन स्वामी, विठ्ठल बंडगर, धनाजी पाटील यांच्या पथकाने केली.----------------------मंगळवारी गुन्हे शाखेचे शैलेश जगताप यांच्या माहितीवरुन पोलिसांनी तब्बल साडेबारा लाखांचे अफीम जप्त केले होते. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात जगताप यांना खब-याने दिलेल्या माहितीवरुन चौदा लाखांचे चरस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर जगताप यांनी गेल्या वर्षभरात सिंहगड रोड परिसरातुन ५३ लाखांचे हेरॉईन, विमानतळ भागातून ५ लाखांचे मेफेड्रोन, बंडगार्डन भागातून २ लाख ९७ हजारांचे कोकेन, रास्ता पेठेतून १२ लाख ५० हजारांचे अफीम असा एकूण ७३ लाख ५७ हजारांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.