पुणे: जमीन दस्त तसेच नोंदणीत उल्लंघन करून दिशाभूल केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (avinash bhosale) यांच्यासह चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहदुय्यम निबंधक एल. एम. संगावार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश निवृत्ती भोसले (रा. लॉरी इस्टेट, बाणेर), विनोद गोयंका (रा. कर्मयोग, एनएस रोड, जुहू, मुंबई), विकास रणबीर ओबेरॉय (रा. एनएस रोड, जुहू, मुंबई), सिद्धार्थ राजेंद्र मयूर (रा. लकाकी रस्ता, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), सुमन निवृत्ती निकम, नितीन निवृत्ती निकम, देवकी निलेश निकम, नीलम विकास सूर्यवंशी, अक्षय विकास सूर्यवंशी (सर्व रा. संगमवाडी), सपना अभय जैन (रा. आर्यम बंगला, श्रद्धा कॉलनी, जळगाव), कल्पना प्रमोद रायसोनी (रा. जळगाव), विकास विठ्ठलराव पवार, विपुल विठ्ठलराव पवार (दोघे रा. कपीलनगर, खाणगाव रस्ता, लातूर), ज्योती राजेंद्र पवार (रा. शिवर्कीती, घोरपडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी भारतीय नोंदणी नोंदणी अधिनियम १९०८ कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरेदीखत दस्त, विकसन करारनामा या कागदपत्रांमध्ये फेरफार केला. तसेच भारतीय नोंदणी अधिनियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याचे सहदुय्यम निबंधक संगावार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. चेतन काळूराम निकम यांनी याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक आठ येथे तक्रार अर्ज दिले होते. सात दस्तांबाबत त्यांनी तक्रार केली होती.
या तक्रार अर्जाची चौकशी सह जिल्हा निबंधक मुद्रांक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी चौकशी सुरू केली होती. चौकशीत उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. संगमवाडी येथे चेतन निकम यांच्या जमिनीच्या खोटया नोंदी करण्यात अल्या. दस्तामध्ये त्यांची जमीन नमूद न करता ती विक्री करणा-या व्यक्तीची असल्याचे भासविण्यात आले. काही खरेदी खतातील सर्वेक्षण क्रमांक चूकीचे टाकून मूळ मालकी असलेल्या अरदेसर बमनजी सेठाा यांच्या जमिनीची देखील चुकीची नोंद केली, असे फिर्यादीत संगावार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.