निमोणे : शिरूर तालुक्यातील निमोणे येथे वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये अखेर चौथ्या दिवशी बिबट्या जेरबंद झाला असून शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मात्र अद्यापही या भागात दुसऱ्या बिबट्यांचा वावर असल्याने या भागात आणखी पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी युवा कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. निमोणे (ता. शिरूर) येथील इनाम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. अनेकांना या बिबट्यांनी दर्शन दिल्याने त्यांची पाचावर धारण बसली होती. या भागातील शेळ्या आणि कुत्री यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. त्यामुळे परिसरात मोठे दहशतीचे वातावरण होते. त्यामुळे स्थानिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी त्वरित हालचाली करून या भागात ५ मे रोजी विठ्ठल काळे यांच्या शेतात पिंजरा लावला. तीन दिवसांच्या हुलकावणीनंतर चौथ्या दिवशी मंगळवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला. शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एस. एल. गायकवाड, नियत क्षेत्र अधिकारी बी. एम. दहातोंडे, वनकर्मचारी संपत पाचुंदकर व नवनाथ गांधिले यांनी जेरबंद बिबट्या ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याची रवानगी माणिकडोह (जुन्नर) येथे निवारा केंद्रात करण्यात आली.अलीकडच्या काळात या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढल्याने, शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेला एकट्याने फिरू नये, हातात काठी व उजेडासाठी टॉर्च असावा, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवावीत, फटाक्यांचा आवाज करावा, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी एस. एल. गायकवाड यांनी केले आहे.