बारामती: पारवडी येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची प्राणीमित्र आणि वनविभगाच्या प्रयत्नांमुळे सुटका करण्यात आली. येथील शेतकरी उत्तम दादाराम गावडे यांच्या विहिरीत गेल्या दोन दिवसापासून कोल्हा (गोल्डन जँक्कल) पडला होता.
गावडे यांच्या विहिरीतील पाणी सुरवातीला खोलवर होते.त्यामुळे कोल्ह्याला विहिरीच्या बाहेर येता येत नव्हते. दोन दिवसात पाणी वाढल्यानंतरदेखील त्याला विहिरीतून वर कोल्ह्याला निघता येत नसल्याने शेतकरी गावडे यांनी मदतीसाठी बारामती वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर या परिसराच्या वन कर्मचारी अर्चना कवितके यांनी ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या प्राणीमित्रांना मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर संस्थेचे सदस्य व वनकर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पिंजऱ्याचा वापर करीत अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुरक्षित बाहेर काढले.
बचाव मोहिमेत ग्रीन वर्ल्ड फांऊडेशन संस्थेचे विकी आगम, अमर कुचेकर, मांढरे, अमोल जाधव व विठ्ठल कोकणे यांनी सहभाग घेतला. या सर्वांनी विहिरीत उतरून कोल्ह्याला पिंजऱ्यात बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर कोल्ह्याला जवळच वनविभागाच्या क्षेत्रात नेऊन कोल्ह्याला सुखरूपपणे निसर्गात सोडून देण्यात आले. शेतकरी गावडे यांच्यासह बारामतीतील ग्रीन वर्ल्ड ने दाखविलेले प्रसंगावधान, वनविभागाच्या तत्परतेने कोल्ह्याला जीवदान मिळाले. यावेळी वनविभागाचे वनरक्षक अनिल काळंगे, वनकर्मचारी अर्चना कवितके उपस्थित होते.