पुणे : वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला याचे दुःख आम्हालादेखील आहे. याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे; मात्र गेले आठ महिने हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यास इच्छुक असतानाही महाविकास आघाडी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. तारीख पर तारीख देत चालढकल केली, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने दहा लॉजिस्टिक पार्क आणि नऊ ड्रायपोर्ट सुरू करण्यात येत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असेही ते म्हणाले.
दि पूना मर्चंटस चेंबरच्या वतीने व्यापारमहर्षी उत्तमचंदजी ऊर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिनिमित्त आदर्श व्यापारी उत्तम पुरस्काराचे वितरण रविवारी मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर महाराष्ट्र चेंबर अँड कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललीत गांधी, उद्योगपती प्रकाश धारीवाल, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, आदी उपस्थित होते़
राज्यस्तरीय पुरस्कार रत्नागिरीचे सुहास पटवर्धन, पुणे जिल्हास्तरीय पुरस्कार सतीश चोरडिया, शहरस्तरीय पुरस्कार शाम अगरवाल, चेंबरच्या सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार जवाहरलाल बोथरा आणि आदर्श पत्रकार पुरस्कार हर्षद कटारिया यांना देण्यात आला. उषा अगरवाल, जवाहरलाल बोथरा, चोरडिया यांनी मनोगत व्यक्त केले.
- व्यापारी आणि उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे.
- शिंदे-फडणवीस सरकार दरवर्षी २५ हजार उद्योजक निर्माण करणार असून, त्या माध्यमातून ५० हजार रोजगार देईल. ज्यातून महाराष्ट्र उद्योगात प्रथम क्रमांकावर येईल.