पुणे : १९७१ च्या युद्धात भारतीय हवाई दलाने दैदिप्यमान कामगिरी केली. वैमानिकांनी पाकिस्तानच्या हवाई दलाची धूळधाण उडविली. शत्रू प्रदेशात भारतीय सैनिकांना उतरवत शत्रूला नामोहरम केले. सातत्याने गगन भरारी घेत शत्रूची विमाने पाडली. यात भारतीय विमानांचेही नुकसान झाले. मात्र, भारतीय अभियंत्यांनी मोलाची कामगिरी बजावत काही तासांत ही विमाने पुन्हा उड्डाणासाठी सज्ज केली. या एकत्रित प्रयत्नांमुळेच पाकिस्तानला अपमानजनक पराभव या युद्धात स्वीकारावा लागला असे म्हणत १९७१ च्या युद्धातील थरारक घटनांचा उलगडा या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या वैमानिकांनी केला.
८९ वा भारतीय हवाई दल दिन आणि १९७१ च्या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एअर स्टेशनचे प्रमुख एअर कमांडर वीरेंद्र असुदान, निवृत्त एअर मार्शल ए. आर. गांधी आणि निवृत्त वायुसेना अधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारत पाकिस्तान युद्धाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या स्वर्णिम विजय मशालीचे स्वागत यावेळी करण्यात आले. या मशालीला गांधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून १९७१ च्या युद्धातील शहिदांना आदरांजली वाहिली. या युद्धात सहभागी असलेल्या निवृत्त वायुसेना अधिकाऱ्यांचा यावेळी गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष युद्धात सहभाग नोंदवलेल्या वैमानिकांनी त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.
सुखोई, ब्रम्होस, आकाश क्षेपणास्त्राचे प्रदर्शन
८९ व्या हवाई दल दिनानिमित्त लोहगाव विमानतळावर विशेष कार्यक्रमात लढाऊ विमान सुखोई एमकेआय ३०, ब्रम्होस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र तसेच वायू दलातर्फे वापरली जाणाऱ्या इतर शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच भारतीय हवाई दलाच्या इतिहासाची साक्ष देणारे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते.
निवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक आठवणींना दिला उजाळा
भारतीय हवाई दलाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ या दिवशी झाली. भारतीय हवाई दलात १ लाख ७० हजार अधिकारी आणि जवान आहेत. तर, सुमारे दीड हजार विमान आहेत. भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय हवाई दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. या कार्यक्रमात निवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक आठवणींना उजाळा दिला.