पुणे : फेसबुकवरुन मैत्री करुन आर्थिक फसवणुक हाेत असल्याचे प्रमाण सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील डाॅ तरुणीला फेसबुकवरुन प्रेमात पाडून लाखाे रुपयांना गंडा घालण्यात आल्याचे समाेर आले हाेते. तशीच घटना पुन्हा एकदा समाेर आली आहे. 37 वर्षीय महिलेशी फेसबुकवरुन ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवून 10 लाख 80 हजार 400 रुपयांना लुटल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी फसवणुक झालेल्या महिलेने मुंढवा पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पाेलिसांनी अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार 28 एप्रिल पासून सुरु झाला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आराेपीने फिर्यादी महिलेशी फेसबुकवरुन मैत्री केली. फिर्यादी महिलेशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. तसेच लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला काही गिफ्ट्स पाठवले असून ती साेडवून घेण्यासाठी विविध बॅंक खात्यांमध्ये वेळाेवेळी पैसे भरण्यास सांगितले. अशाप्रकारे आराेपीने फिर्यादीकडून तब्बल 10 लाख 80 हजार 400 रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पाेलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
याप्रकरणी मुंढवा पाेलीस अधिक तपास करीत आहेत.