पुणे : मेट्राेमाेनिअल साईटवरुन ओळख करुन महिलेला लग्नाचे आमिष दाखवत दिवंगत आई वडिलांचे घर खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचे म्हणत पुण्यातील एका 37 वर्षीय महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मेट्राेमाेनिअल साईटवरील सुर्या क्रिशनन या नावाच्या व्यक्तिवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील एका 37 वर्षीय महिलेची भारत मेट्राेमाेनिअल या साईटवर सुर्या क्रिशनन या इसमाशी ओळख झाली. क्रिशनन हा एप्रिल 2018 ते 4 मे 2018 या कालावधीत महिलेशी चटींगद्वारे संपर्कात हाेता. क्रिशनन याने महिलेला लग्नाचे देखील आमिष दाखवले हाेते. भारतात एक फिनिशिंग स्कुल सुरु करायचे असल्याचे क्रिशनन याने फिर्यादीला सांगितले हाेते. तसेच त्याचे दिवंगत आई- बाबा राहत असलेले चेन्नई येथील घर विकत घ्यायचे असून त्यासाठी पैसे कमी पडत असल्याचे सांगत महिलेकडून 11 लाख रुपये उकळण्यात आले. भारतात आल्यावर आपण लग्न ठरवु असे सांगत क्रिशनन याने महिलेला त्याच्या बॅंक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने हडपसर पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
हडपसर पाेलीस अधिक तपास करीत आहेत.