बारामती : आयुर्वेदिक औषधांची डिस्ट्रिब्युशनशिप देण्याच्या नावाखाली सुमारे साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याबाबत येथील संतोष गणपत रेणके (रा.कांचननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल पाटील, सुरेश त्रिपाठी, अविनाश शर्मा, संजीव नांगर, अजित जयस्वाल (पूर्ण नाव, पत्ते नाहीत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरापूर्वी फिर्यादी यांना फेसबुकवर संबंधित आयुर्वेदिक कंपनीची जाहिरात दिसली. त्यांना डिलरशिप घ्यावयाची असल्याने त्यांनी वेबसाईटच्या पेजवर जात तेथील जाहिरातीवरील क्रमांक मिळविला. त्यावर १७ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी संपर्क साधला असता समोरून विशाल पाटील हा रिलेशनशिप मॅनेजर बोलत असल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी डिलरशिप पाहिजे, असे सांगितल्यावर त्यांनी दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरे, फर्निचर, एसी आदी सर्व गोष्टी कंपनी आपल्याला हव्या तशा करून देते त्यासाठी दोन लाख रुपये भरावे लागतील. तुम्ही ते भरल्यास चार लाख रुपयांचा माल तुम्हाला कंपनी देईल, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या मेल आयडीवर रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवून दिला. तो लवकरात लवकर भरून कंपनीच्या मेलवर पाठविण्यास सांगण्यात आले. हा फॉर्म फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे भरला. त्यानंतर त्यांचे वेळोवेळी विशाल पाटील यांच्याशी तसेच डिस्ट्रिब्युशन मॅनेजर सुरेश त्रिपाठी, एचआर डिपार्टमेंटचे अविनाश शर्मा, टीम लीडर अजित जयस्वाल अशी नावे व पदे सांगणारांशी बोलणे होत होते. या सर्वांनी त्यांना डिस्ट्रिब्युशनशिप देतो असे सांगत जम्मू ॲण्ड काश्मीर बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँकेत वेळोवेळी रक्कम भरायला सांगितली. फिर्यादीने या वेगवेगळ्या खात्यांवर ७ लाख ५४ हजार रुपये भरले. त्यानंतर पुन्हा संपर्क केला असता हे क्रमांक बंद लागू लागले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.