पुणे : ससून रुग्णालयातील डेटा ऑपरेटरने पैसे घेऊन बनावट अपंगत्वाचा दाखला देत प्रशासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन चंद्रकांत बाजारे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.ससूनमधील प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपंगांना शासकीय सोयी सुविधा देण्यात येतात. त्यासाठी शासकीय रुग्णालयाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक आहे. अपंगत्वाची चाचणी केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते.
ससून रुग्णालयातील एचएमआयएस प्रकल्प विभागाकडून अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येते. या विभागातील संगणक ऑपरेटर सचिन बाजारे याने सांग सिंह यांना बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दिले. त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे घेतले. बनावट अपंगत्व प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.