धायरी (पुणे) : ५६ हजार रुपये घेवूनही चारधाम यात्रा न घडविता एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी धायरी येथील ट्रॅव्हल्स कंपनीच्या तीन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रिमकास्टर टूर्स अँड ट्रॅव्हर्ल्स या ट्रॅव्हल्सचे ऋषिकेश रामचंद्र भडाळे, संकेत रामचंद्र भडाळे व सुप्रिया संकेत भडाळे (सर्व राहणार : धायरी, पुणे) अशी या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी रंजित तुलशीदास पवार (वय: ३८ वर्षे, रा. मु.पो. निगडी जि. सातारा) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २६ फेब्रुवारी रोजी धायरी येथील अजिंक्यतारा मित्र मंडळाजवळ असलेल्या ड्रिमकास्टर टूर्स अँड ट्रॅव्हर्ल्स या ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये ऋषिकेश रामचंद्र भडाळे यांनी तक्रारदार यांच्याकडून चारधाम यात्रेसाठी बुकींग म्हणून एकवीस हजार रुपये घेतले. त्यानंतर चारधाम यात्रेसाठी संकेत रामचंद्र भडाळे यांनी वेगवेगळे मेसेजेस पाठवुन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. तसेच संकेत भडाळे यांनी त्यांची पत्नी सुप्रिया यांच्या खात्याचा क्यूआर कोड पाठवून त्यावर उर्वरित पस्तीस हजार रुपये पाठवण्यास सांगितले. दरम्यान एकूण छप्पन हजार रुपये घेऊनही चारधाम यात्रा न पुरविता विश्वासघात करून फसवणूक केल्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव करीत आहेत.
स्वस्तात परदेशी सहलीचे दाखवतात आमिष... बरेच जण सुट्टी पडण्याआधीच पिकनिकचा बेत आखतात. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही जाण्यास लोक वाढती पसंती देत आहेत. याचाच गैरफायदा उठवणाऱ्या मंडळींनी डोके वर काढले आहे. असा टूरचा बेत आखणाऱ्या लोकांनी टूर पॅकेज करताना सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. सध्या काही बनावट ट्रॅव्हल कंपन्या स्वस्तात परदेशी सहलीचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
धायरीतील या ट्रॅव्हल्स कंपनीने १४५ जणांना गंडा घातल्याचे समोर येत असून जवळपास ४० लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. यातील मुख्य आरोपी संकेत भडाळे याला पोलिसांनी अटक केली आहे . आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव यांनी केले आहे.