लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोथरूड येथील जमीन प्रकरणात बनावट कागदपत्रे दाखल करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून राजेश बजाज यांना अटक करण्यात आली होती. मात्र, ते हस्ताक्षर बजाज यांचे नसल्याचा अहवाल सीआयडीने दिला. दरम्यानच्या काळात दोन महिने बेकायदा अटकेत राहावे लागल्याने आपली बेअब्रू झाल्याचा दावा बजाज यांनी केला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, राजेश खैरातीलाल बजाज (वय ५८, रा. एरंडवणा) यांचे वडील व काका यांनी ८ एप्रिल १९८६ रोजी नोंदणीकृत खरेदी खतान्वये कोथरुडमधील १०० फुटी डीपी रोडजवळील जमीन विकत घेतली होती. या जागेवरुन बजाज आणि दाढे यांच्या वाद निर्माण झाला होता.
फिर्यादीचे काकांच्या नावे या मिळकतीच्या अनुशंगाने हक्क सोडपत्र ३० मे १९८८ रोजी फिर्यादी यांनी बनावट तयार केले, म्हणून त्यांच्याविरुद्ध बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १२ जून २०१६ मध्ये फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी राजेश बजाज यांना ऑक्टोबर २०१७ मध्ये अटक केली होती. दरम्यान, जे हक्क सोडपत्र बजाज यांनी बनावट तयार केल्याचा आरोप होता, ते हक्क सोडपत्र राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी)मधील हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविण्यात आले.
फिर्यादीचे हस्ताक्षर हे त्यांच्या काकांच्या हक्क सोडपत्राशी जुळत नसल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला. आरोपींने फिर्यादीचे विरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमुळे बजाज यांना दोन महिने बेकायदेशीर अटकेत रहावे लागले. या सर्व प्रकारामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शारीरिक, मानसिक त्रास तसेच बेअब्रू व्हावे लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बजाज यांच्या फिर्यादीवरुन बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.