लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माय लॅॅब या कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट डोमेन, सेल्स ऑर्डर आणि फेसबुक पेज तयार करून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरातमधील दोघांना अटक केली.
संस्कार संस्कृत ऊर्फ ॠषी (वय १९) आणि प्रशांत सिंग ऊर्फ गुट्टू (वय २४, दोघेही रा. जामनगर, गुजरात) ही संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार भावेश पासवान याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी त्यांना येत्या २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. चेतन सोनराज रावळ (वय ३४, रा. बाणेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १९ जुलै २०२१ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने ही फसवणूक झाली.
आरोपींनी या कंपनीच्या नाम साधर्म्यचा वापर करून त्यासारखे हे नवीन डोमेन तयार केले. त्याद्वारे त्यांनी बनावट सेल्स ऑर्डर तयार केली. तसेच आरोपींनी एक बनावट फेसबुक पेज तयार करून त्यामार्फत फिर्यादीची कंपनी ही कोरोनाच्या चाचणी किट प्रॉडक्ट विकणारी असल्याचे भासवून ई-मेल, बँक खाती, फोन नंबरद्वारे लोकांची फसवणूक केली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंकुश चिंतामण याप्रकरणी तपास करीत आहेत.