पुणे : नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणीला गंडा घालणाऱ्या चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेकडून दिल्लीत अटक करण्यात आली. चोरट्यांकडून१४ मोबाईल, सिम कार्ड, लॅपटॉप, डेबिट कार्ड असा माल जप्त करण्यात आला आहे. पिंटू कुमार यादव (वय २५) आणि सतीश राज यादव (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत हडपसर भागातील एका तरूणीने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. या तरुणीने नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानंतर यादव यांनी तरूणीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. नोकरीविषयक सेवा देणाऱ्या संस्थेतून बोलत असल्याची बतावणी दोघांनी तिच्याकडे केली होती. बड्या कंपनीत नोकरीची संधी असल्याचे आमिष त्याने तिला दाखविले आणि सुरूवातीला तरूणीला काही पैसे भरावे लागतील, असे सांगितले.त्यानंतर तरूणीला एका बँकेचा खाते क्रमांक पाठविला. खाते क्रमांकात वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी तिला ५४ हजार ३०० रुपये भरण्याची सूचना केली होती. तरूणीने बँक खाते तसेच पेटीएमवर काही रक्कम भरली. दरम्यान, पैसे जमा झाल्यानंतर आरोपींनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला होता. तांत्रिक तपासात आरोपींनी वापरलेले वेगवेगळे मोबाईल क्रमांक, बँक खात्याबाबतची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेचे पथक तातडीने दिल्लीत रवाना झाले. यादव यांना दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह, सहाय्यक आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, उपनिरीक्षक नितीन म्हस्के, अजित कुऱ्हे , नितेश शेलार, शिरीष गावडे, संतोष जाधव, अनुप पंडीत, शीतल वानखेडे यांनी ही कारवाई केली.
नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 15:58 IST
बड्या कंपनीत नोकरीची संधी असल्याचे आमिष दाखवत सुरूवातीला तरूणीला काही पैसे भरावे लागतील,असे सांगण्यात आले.
नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या दोघांना अटक
ठळक मुद्देसायबर क्राईमची कामगिरी : दिल्लीतून घेतले ताब्यातआरोपींनी खाते क्रमांकात वेगवेगळी कारणे सांगून तरूणीला ५४ हजार ३०० रुपये भरण्याची सूचना