उरुळी कांचन : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला फसवून हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड काढून घेऊन नंतर त्या एटीएम कार्डद्वारे शेतकऱ्याच्या खात्यातील पैसे काढून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी बाळासाहेब म्हस्कू थोरात (वय ५९, रा. हिंगणगाव, ता. हवेली) यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या खात्यातून तब्बल १ लाख २० हजार रुपये काढून घेतले आहेत. बाळासाहेब थोरात हे शेतकरी असून त्यांचे उरुळी कांचन येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. रविवारी (दि. ९) उरुळी कांचनचा आठवडे बाजार होता. या बाजारातून घरात लागणारा भाजीपाला व इतर वस्तू घेण्यासाठी थोरात यांना पैशाची आवश्यकता होती. म्हणून एलाईट चौकातील एका सहकारी बँकेच्या एटीएममध्ये ते गेले होते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्या वेळी एटीएममधून पैसे निघाले नाहीत.अचानक त्या वेळी तेथे गोरा, मध्यम बांधा असलेला २५-३० वर्षे वयाचा एक तरुण आला. तो थोरात यांना म्हणाला, तुम्हाला पैसे निघत नाहीत. मी मदत करतो. एटीएम कार्ड माझ्याकडे द्या. थोरात यांच्याकडून त्याने एटीएम कार्ड घेऊन एटीएममध्ये टाकले. नंतर त्याने थोरात यांना पासवर्ड टाकण्यास सांगितला. त्यानुसार त्या तरुणासमोरच थोरात यांनी पासवर्ड टाकला. परंतु तरीही पैसे निघाले नाहीत. त्या वेळी त्या तरुणाने हातचलाखी करून दुसरेच कार्ड थोरात यांच्या हातात दिले. थोरात ते दुसरेच कार्ड खिशात टाकून आठवडे बाजारात निघून गेले. बाजार घेऊन ते आपल्या घरी निघून गेले.त्या नंतर ११ डिसेंबर रोजी बाळासाहेब थोरात सदर बँकेत गेले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या पासबुकमध्ये एंट्री करून घेतल्या. पासबुक तपासल्यावर त्यांच्या लक्षात आले, की आपल्या खात्यातून तब्बल १ लाख २० हजार रुपये काढण्यात आले आहेत. या विषयी त्यांनी बँकेतील कर्मचाºयांकडे चौकशी केली. त्या वेळी संबंधित कर्मचाºयाने अशी माहिती दिली, की तुमच्या एटीएम कार्डद्वारे तुमच्या खात्यातून एकूण एक लाख वीस हजार रुपये वेगवेगळ्या एटीएममधून काढण्यात आले आहेत. लोणी काळभोर येथील एटीएम मधून ९ डिसेंबर रोजी ४० हजार रुपये, कर्जत येथील एटीएममधून १० डिसेंबर रोजी ४० हजार रुपये व तारकपूर (जि. अहमदनगर) येथील एटीएममधून ११ डिसेंबर रोजी ४० हजार रुपये असे एकूण एक लाख वीस हजार रुपये काढण्यात आले आहेत. त्या वेळी बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खिशातील एटीएम कार्ड तपासले असता ते दुसºयाचे कार्ड होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
खात्यातील १ लाख २० हजार काढून शेतकऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:07 AM