पुणे : वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिकला जायचे असल्याचे सांगून कार मागून घेऊन गेला. त्यानंतर ४ महिने झाल्यानंतरही ती परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणीकंद पोलिसांनी अंबर अनिब चॅटर्जी (रा. चिंचवडी) आणि मामिन शेख यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सागर रामचंद्र इसवे (वय ३३, रा. लोणीकंद) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सागर उसवे आणि अंबर चॅटर्जी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चॅटर्जी याने वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिकला जायचे आहे, असे सांगून त्यांच्याकडे कार मागितली. वडिलांच्या उत्तरकार्यासाठी जायचे असल्याने फिर्यादी यांनी गाडी देतो, असे सांगितले. त्यानुसार चॅटर्जी यांनी पाठविले असल्याचे सांगून मामिन शेख हा २ जून २१ रोजी दुपारी त्यांची गाडी घेऊन गेला. मात्र, त्याने कार परत केली नाही.
त्यानंतर फिर्यादी यांनी अनेकदा गाडी परत मागितली तरी त्यांनी गाडी परत देण्यास टाळाटाळ केली. गाडी परत देत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे इसवे यांच्या लक्षात आले. त्यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस हवालदार सेंगर तपास करीत आहेत.