पुणे : धार्मिक संस्थेत जमा झालेल्या शंभर रुपयांच्या नोटांबदल्यात ५०० आणि २ हजारांच्या नोटा दिल्यास वीस टक्के मोबदला देण्याच्या आमिषाने दोघांना साडेपाच लाख रुपयांना लुटल्याची घटना कोंढव्यात घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र गुप्ता (वय ४१, रा. वैदवाडी, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुप्ता यांना त्यांच्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून अशपाक अन्सारी यांची भेट झाली. अन्सारी याने शहा नावाच्या एका व्यक्तीकडे शंभर रुपयांच्या खूप नोटा असल्याचे सांगितले. शहा एका धार्मिक संस्थेशी संबंधित आहेत. त्याला शंभर रुपयांच्या बदल्यात ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा दिल्यास त्यात २० टक्के कमिशन मिळेल. ती रक्कम आपण दहा-दहा टक्के वाटून घेऊ असे दोघांनी ठरविले. गुप्ता यांनी ५० हजार आणि त्यांचा मित्र अविनाश वैद्य यांच्याकडील साडेसहा लाख असे सात लाख रुपये त्यांनी संबंधितांना दिले. आरोपींनी १ लाख ६० हजार रुपये दिले. मात्र, उर्वरीत ५ लाख ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. वाडकर पुढील तपास करीत आहेत.
नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने साडेपाच लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:27 PM
धार्मिक संस्थेत जमा झालेल्या शंभर रुपयांच्या नोटांबदल्यात ५०० आणि २ हजारांच्या नोटा दिल्यास वीस टक्के मोबदला देण्याच्या आमिषाने दोघांना साडेपाच लाख रुपयांना लुटल्याची घटना कोंढव्यात घडली.
ठळक मुद्दे ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा दिल्यास त्यात २० टक्के कमिशनचे आमिष