पुणे : कोल्हापूर येथील धर्मादाय सहआयुक्तांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन कार्यकारिणी आणि व्यवस्थापकांवर ठपका ठेवून १० लाख ७८ हजारांची रक्कम महामंडळाकडे जमा करण्याचे आदेश धर्मादाय सहआयुक्तांनी दिले आहेत. मात्र त्यांनी पैसे न भरल्यास किंवा प्रतिसाद न दिल्यास महामंडळ अहवाल तयार करून, पुढील कारवाई करण्यासाठी तो धर्मादाय सहआयुक्तांकडे पाठविणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात २०१० ते २०१५ दरम्यान चित्रपट महामंडळामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून विजय शिंदे, रणजित जाधव, प्रमोद शिंदे आणि भास्कर जाधव यांनी तक्रार अर्ज दाखल करून या प्रकरणाला वाचा फोडली. धमार्दाय सहआयुक्तांनी अखेर २०१० ते २०१५ मध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थिक गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. गोस्वाल-देसाई अँड कंपनी यांनी महामंडळाच्या कागदपत्रांची चौकशी करून सादर केलेल्या सविस्तर अहवालात कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यांच्या संमतीने महामंडळाचे व्यवस्थापक रविंद्र बोरगांवकर यांनी गैरव्यवहार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांच्या कालावधीत बोरगांवकर यांनी कार्यकारिणी सदस्यांच्या संमतीने अथवा अपरोक्ष विविध खर्चांसाठी खोटी बिले सादर केली. कामकाजातील काही खर्चांची दोन वेगळी बिले सादर केली गेली. यातून मिळणारे ज्यादा पैसे त्यांनी वैयक्तिक खाण्यापिण्याचा खर्च तसेच प्रवास खर्चासाठी वापरले. याशिवाय पाच वर्षांच्या कालावधीमध्ये असंख्य बिलांची फेरफार झाली असून खोडाखोड करून बिलांची रक्कम वाढवण्यात आली, असे चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. धमार्दाय आयुक्तालयाकडे चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर सहआयुक्तांनी तत्कालीन कार्यकारिणीतील संचालिका प्रिया बेर्डे, व्यवस्थापक रविंद्र बोरगांवकर, दत्तप्रसाद अष्टेकर महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर आणि इतर संचालकांकडून त्यांची बाजूही नोंदवून घेतली. यावेळी कार्यकारिणी मंडळाला आयुक्तांसमोर गैरव्यवहाराचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करता आले नाही. त्यामुळे अखेर चौकशी अहवालात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आयुक्तालयाने महामंडळाची कार्यकारिणी आणि व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवत दंडाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश महामंडळाला दिले असल्याचे तक्रारदार आणि महामंडळाचे सदस्य रणजित जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ----------------------------------------------------------’ आम्ही कार्यकारिणी एकत्र बसून चर्चा करू आणि त्यावर एकमताने निर्णय घेऊ- विजय पाटकर, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ -----------------------------------
चित्रपट महामंडळाच्या माजी कार्यकारिणी आणि व्यवस्थापकांवर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 8:57 PM
पाच वर्षांच्या कालावधीत कार्यकारिणी सदस्यांच्या संमतीने अथवा अपरोक्ष महामंडळाचे व्यवस्थापक रविंद्र बोरगांवकर यांनी विविध खर्चांसाठी खोटी बिले सादर केली.
ठळक मुद्दे१० लाख ७८ हजार रूपये जमा करा : धर्मादाय सहआयुक्तांचे आदेशपाच वर्षांच्या कालावधीमध्ये असंख्य बिलांची फेरफार