पुणे : माळीण दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने मित्राच्या वडिलांकडून २ लाख ६२ हजार रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजितकुमार दिनेशकुमार पांडे (वय २४, रा. प्रतीकनगर, पौड रोड, कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी उपणेश सत्यनारायण ठाकूर (वय ४७, रा. कृष्णकुंज सेक्टर, कामोठा, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी ठाकूर हे नौसेनेमधून काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुंबईमध्ये इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय आहे. तर पांडे हा ठाकूर यांच्या मुलाचा मित्र आहे. त्यांचा मुलगा आणि पांडे एकत्र शिकायला होते. माळीण दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी कार्यक्रम घेऊन त्याच्या तिकीट विक्रीमधून मिळणारे पैसे मदत म्हणून देण्यात येणार आहेत. आरोपीने यासाठी सिग्नेचर स्टाईल इव्हेंट आणि सोल्युशन प्रा. लिमीटेड या कंपन्यांद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे भासवले. त्यासाठी ठाकूर यांच्याकडून २ लाख ६२ हजार रुपये धनादेशाद्वारे घेतले. बरेच दिवस ठाकुर कार्यक्रम होण्याची वाट पहात होते. कोरेगाव पार्क येथील रागा लॉन्स येथे कार्यक्रम आयोजित केल्याची थाप त्याने मारली. कार्यक्रमासाठी कोरेगाव पार्क येथे आलेल्या ठाकूर यांना कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नसल्याचे समजले.सर्व प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा कुटुंबियांना आणि त्यांना मारण्याची धमकी दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पांडे याने अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता असून त्यादृष्टीनेही तपास आहे. पांडे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहायक निरीक्षक मोरे करीत आहेत. (वार्ताहर)
माळीण दुर्घटनाग्रस्तांना मदतीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक
By admin | Published: February 10, 2015 1:21 AM