पुणे: एका नामांकित फुड्स कंपनीची वेबसाईट तयार करून त्यावरून फ्रॅन्चायजी देण्याच्या आमिषाने पावणे सात लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२० मध्ये घडली.
याबाबत उत्कर्ष कन्हैय्यालाल अग्रवाल (वय ३६, रा.वडगाव शेरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हल्दीराम फुड्स कंपनीची बनावट वेबसाईट तयार केली. त्यानंतर तक्रारदार यांना फोन करून संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करून कंपनीची एक फ्रॅन्चायजी देण्याचे आमिष दाखविले. ही फ्रॅन्चायजी देण्यासाठी त्यांच्याकडून नोंदणी शुल्क, सुरक्षा ठेव, करारनामा शुल्क, आतील सजावट अशा विविध गोष्टींसाठी एका बँक खात्यावर सहा लाख ७४ हजार रूपये भरायला सांगितले. तक्रारदार यांनी त्यानुसार बँक खात्यात पैसे भरले. पण, आरोपींनी त्यांना फ्रॅन्चायजी दिली नाही. वारंवार संपर्क केला तरी त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक किरण औटे हे अधिक तपास करत आहेत.