पुणे : दीड लाखात पाचशे अमेरीकी डाॅलर देण्याचे सांगत डाॅलर ऐवजी कागदाची बंडल देऊन बुधवार पेठेतील दुकानदाराची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी पाेलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आराेपींचा शाेधे घेत त्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडे चाैकशी केली असता त्यांनी याआधी देखील अनेक लाेकांना अमेरिकी डाॅलरचे आमिष दाखवून फसविल्याचे समाेर आले आहे.
याप्रकरणी आशिष विजय चव्हाण ( वय 39 रा. आंबेगाव खुर्द) यांनी फरासखाना पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली हाेती. पाेलिसांनी बबलू हरेश शेख (वय 45) , सेतु आबु मतुबुर (वय 20), सिंतु मुतलीक शेख (वय 36), रिदाेई महमद खान (वय 19) यांना या गुन्ह्यात अटक केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष चव्हाण यांचे बुधवार पेठ येथे चप्पल बुट विक्रीचे दुकान आहे. ते दुकानात असताना बबलु शेख हा गिऱ्हाईक म्हणून आला. त्याने दुकानातून 750 रुपयांचा स्पाेर्ट शुज खरेदी केला. शुज खरेदी केल्यानंतर बबलुने त्याच्याकडील 20 डाॅलरची नाेट चव्हाण यांना दाखवून ती तुमच्याकडे चालते का असे विचारले. त्यावर चव्हाण यांनी चालत नसल्याचे सांगितले. त्यावेळी डाॅलरची किंमत 70 रुपये असून मी तुम्हाला 30 रुपयात देताे असे सांगून बबलुने चव्हाण यांना आणखी एक नाेट दिली. तसेच ती तुमच्याकडे चालते का ते बघा व खात्री झाल्यावर सांगा असे म्हणत चव्हाण यांचा फाेन नंबर घेऊन ताे निघून गेला.
चव्हाण यांनी मित्रांकडे डाॅलर खरा आहे का याबाबत खात्री केली. नाेट खरी असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी बबलुला फाेन केला. त्यानंतर 6 जून राेजी बबलुने चव्हाण यांना डाॅलर पाहण्यास दांडेकर पुलाजवळ बाेलावले. चव्हाण तेथे गेल्यावर बबलुने त्यांना कॅनाॅलकडे नेले व तेथे खरे अमेरिकन डाॅलर दाखवले. त्यावर चव्हाण यांचा विश्वास बसल्यानंतर दीड लाखात 500 डाॅलर देण्याचा त्यांचा व्यवहार ठरला. 8 जूनला आराेपी हे श्रीकृष्ण टाॅकिज जवळ येऊन त्यांनी चव्हाण यांना डाॅलर आणल्याचे सांगितले. चव्हाण तेथे गेल्यानंतर आराेपीने डाॅलर ठेवलेली कॅरिबॅग चव्हाण यांना दिली आणि त्यांच्याकडून त्याने दीड लाख रुपये घेतले. चव्हाण हे दुकानात गेल्यानंतर त्यांनी कॅरीबॅग निट पाहिली असता बंडलला एक अमेरीकी 20 डाॅलरची नाेट व इतर कागदी गंडाळी असल्याचे दिसून आले.
पाेलिसांनी या घटनेचा तपास करताना सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात चव्हाण यांनी आराेपींना ओळखले. त्यावरुन पाेलिसांनी आराेपींचा माग काढला. आराेपी जनता वसाहत दांडेकर पूल येथे असल्याची माहिती पाेलीस नाईक दिनेश भांदुर्गे यांना मिळाली या माहितीवरुन पाेलिसांनी सापळा रचून आराेपींना पकडले. त्यांची झडती घेतल्यावर खाेटे अमेरिकन डाॅलर, कागदाचे बंडल, गुन्ह्यात वापरलेले माेबाईल आणि सिमकार्ड मिळून आले. आराेपींकडे चाैकशी केली असता त्यांनी शहरातील इतर भागामध्ये देखील नागरिकांची फसवणूक केल्याचे समाेर आले.
अमेरिकन डाॅलर दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टाेळ्या सध्या शहरात कार्यरत असून काेणी अशाप्रकारचे आमिष दाखवत असल्यास पाेलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पाेलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.