पुणे : पतीसोबत होत असलेल्या भांडणांपासून मुक्ती हवी असल्यास नृसिंग व लघुरुद्राचा जप तसेच धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक करण्यात आली. हातचलाखी करुन या महिलेचे घेतलेले १ लाख ९ हजारांचे दागिने परत न करणाऱ्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मार्च २०१८ ते २४ एप्रिल २०१८ या कालावधीत मंडई आणि सारसबागेजवळ घडला.
लोकेश प्रभाकर दिवेकर (वय ४६, रा. परिहार चौक, औंध) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दररोज मंडईमधील स्वामी समर्थ मठामध्ये दर्शनाकरिता जातात. या मठात आरोपी दिवेकर सोबत त्यांची ओळख झाली. त्याला या महिलेने पतीसोबत होत असलेल्या भांडणाची माहिती दिली. त्याने ‘माझ्या आतेभावाचा असा प्रॉब्लेम होता, त्याला नृसिंह व लघुरुद्र जप करायला सांगितला. तुम्ही पण तसेच करा. त्याची विधी कशी करायची ते मी सांगतो.’ असे सांगितले. या विधीसाठी महिलेच्या पतीच्या हातून घेतलेल्याच वस्तू लागतील असे सांगितले.
ही महिला आणि त्यांची आई २४ एप्रिल २०१८ रोजी सारसबाग येथील खंडेबा मंदिरामध्ये त्याला भेटल्या. त्याने त्यांच्याजवळचे १ लाख ९ हजारांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन ते रुमालात बांधले. त्यावर मंत्र जप करुन मंदिराच्या अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर फिर्यादी महिलेस पुन्हा तीन प्रदक्षिणा मारण्यास सांगितले. त्यानंतर रुमालातील वस्तूंची पुजा करुन आठ दिवसांनी रुमाल सोडावा असे बजावले. महिलेने आठ दिवसांनंतर रुमाल सोडला असता त्यामध्ये सोन्याचांदीचे दागिने मिळून आले नाहीत. त्यामध्ये दोन लिंबू आणि अंगठी होती.
त्यांनी आरोपीला फोन करुन घडला प्रकार सांगितला. त्याने असे होणे शक्य नाही, काहीतरी गफलत झाली असे सांगत वस्तू गहाळ झाल्या असतील तर नुकसान भरुन देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे फिर्यादींनी त्यावेळी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती. त्याला वेळोवेळी फोन केल्यानंतरही त्याने प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.