पुणे : अमेरिकेत असताना मानसिक त्रास देऊन क्रूर वागणूक देऊन लग्नात मिळालेले स्त्रीधनाचा अपहार करुन संयुक्त खात्यातील ४८ लाख ६२ हजार रुपये परस्पर काढून घेऊन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रियाल माधव पालकर असं पतीचं नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षाच्या विवाहितेनं वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर २०१४ ते २०२० पर्यंत सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी प्रियाल पालकर यांचा २०१४ मध्ये विवाह झाला. त्यानंतर ते अमेरिकेतील कॅलिफोनिया येथे नोकरीला गेले. दोघांचेही संयुक्त बँक खाते होते. तेथे पतीनं क्रूर वागणूक देऊन फिर्यादी यांचा छळ केला.
त्यांच्या संयुक्त बँक खात्यातून ७४ हजार ८०१ अमेरिकन डॉलर (४८ लाख ६२ हजार रुपये) फिर्यादी यांच्या संमतीशिवाय काढून घेऊन फसवणूक केली. फिर्यादी यांची स्वकमाई देण्याकरीता त्यांना मारहाण व शिवीगाळ करुन धमकी दिली. आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादीची स्वकमाईची मालमत्ता तसेच बँक खात्यातील रक्कम याची माहिती आम्हाला दे नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असे म्हटले. या छळाला कंटाळून फिर्यादी या अमेरिकेहून परत भारतात असून सध्या त्या माहेरी रहात आहेत. ठाणे येथे त्यांचे सासर आहे. सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर अधिक तपास करीत आहेत.