पुणे : जागतिक आरोग्य संघटनेत (डब्ल्यु एच ओ) जिल्हा व तालुका सुपरवायझरपदी नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुण-तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील १० ते ११ जणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी कर्वेनगर येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवशंकर बाहेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे बी कॉमचे शिक्षण झाले आहे. फिर्यादीचा भाऊ कर्वेनगर येथील ऑप्टीमस इन्स्टट्युटमध्ये प्रशिक्षणासाठी जात होता. त्या इन्स्टिट्यूट चालकाच्या माध्यमातून भावाला डब्ल्यु एच ओच्या नोकरीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार फिर्यादी तरुणीने त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आम्हाला जिल्हा सुपरवायझरची डिलरशीप मिळाली असून, त्यानुसार आम्ही डब्ल्यु एच ओत जिल्हा व तालुका सुपरवायझरची पदे भरीत आहोत. ट्रेनिंगसाठी २५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. इन्स्टिट्यूट चालविणाऱ्या दाम्पत्याने देखील सुपरवायझर पदासाठी पैसे भरल्याचे सांगितले. सुरुवातीला भरलेल्या पैशातून लॅपटॉप व टॅब मिळणार असल्याचे सांगितले. फिर्यादी तरुणीने यूआर कोडवर पैसे पाठवले. त्यानंतर तरुणीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून परीक्षा देण्यास सांगण्यात आले. तरुणीने परीक्षा दिल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन करून घेण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने सर्व प्रक्रिया पार पाडल्या. हे सर्व झाल्यानंतर फिर्यादी तरुणीला ट्रेनिंगसाठी पुणे महापालिकेच्या पाठीमागे असलेल्या श्री कन्सल्टन्सी यांचे कार्यालयात बोलावले होते.
अनेक तरुण-तरुणी तेथे आल्या होत्या. त्यांनी चौकशी केली त्यावेळी इंगळे नावाच्या व्यक्तीने डब्ल्यु एच ओमध्ये फ्रॉड झाला असून, तुम्हाला आयसीटी या सरकारी शाळेत नोकरी देऊ असे सांगितले. त्यानंतरही त्यांना नोकरी मिळाली नाही. तरुणी परत चौकशीसाठी गेली असता शिवाजीनगरचे कार्यालय बंद होते. तरुणीने कर्वेनगर येथील ऑप्टिमस इन्स्टट्यूट चालविणार्या दाम्पत्याशी संपर्क केला असता, त्यांनी जाहिरात पाहून पैसे पाठवल्याचे सांगितले. परत फिर्यादी तरुणीने इंगळे यांना संपर्क केला, त्यावेळी त्यांनी देखील आपली फसवणूक झाली असून, तेथील नोकरी सोडल्याचे सांगितले. अधिक माहिती घेतली तेव्हा शिवशंकर बाहेकर नावाच्या व्यक्तीने हा प्रकार केला असून, नोकरीच्या आमिषाने त्याने महाराष्ट्रातील अनेक तरुणांना आर्थिक गंडा घातल्याचे समजले. तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.