राजानंद मोरे, पुणेसार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत कॅशलेस सुविधेचा काही रुग्णालयांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे उघडकीस आले आहे. बोगस रुग्णांच्या नावाने प्रस्ताव तयार करून ही रुग्णालये कंपन्यांकडून फुकटचा पैसा लाटत आहेत. शहरातील एका बड्या रुग्णालयाने अशा प्रकारे तीन बोगस प्रस्ताव तयार करून कंपनीला फसविल्याचे निदर्शनास आले असून, कंपनीकडून संबंधित रुग्णालयाची चौकशी सुरू आहे. सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांसह खासगी कंपन्यांकडूनही विविध प्रकारच्या मेडिक्लेम पॉलिसी योजना तयार करण्यात आल्या आहेत. अनेक जण या पॉलिसीचा फायदा घेतात. मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत कॅशलेस व रिंबर्समेंट (प्रतिपूर्ती) या सुविधा दिल्या जातात. कॅशलेश सुविधेमध्ये पॉलिसीधारक किंवा कुटुंबातील सदस्य एखाद्या रुग्णालयात उपचार घेत असल्यास उपचाराचे पैसे भरावे लागत नाहीत. संबंधित विमा कंपनीकडून थेट रुग्णालयाला हे पैसे दिले जातात. तर रिंबर्समेंट सुविधेमध्ये आधी रुग्णाला आधी रुग्णालयाचा खर्च द्यावा लागतो. त्यानंतर कंपनी संबंधिताला खर्चाची प्रतिपूर्ती करत असते. या दोन्ही सुविधांचा मोठा फायदा सर्वसामान्यांना होत असतो. मात्र, काही रुग्णालयांकडून मेडिक्लेम सुविधेचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे.शहरातील एका बड्या रुग्णालयाने मेडिक्लेम पॉलिसीसाठी तीन बोगस रुग्णांचे प्रस्ताव सार्वजनिक क्षेत्रातील दि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडे सादर केले होते. याबाबत अधिक माहिती देताना कंपनीचे पुणे विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक विजयेंद्र थोरबोले म्हणाले, की यापूर्वी या रुग्णालयात मेडिक्लेम सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांच्या नावाने बोगस प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावाला जोडलेली कागदपत्रे, बिले, त्यावरील सह्याही बनावट करण्यात आल्या होत्या. प्रस्तावाच्या पडताळणीदरम्यान ही बाब कंपनीच्या निदर्शनास आली. कंपनीकडील खऱ्या रुग्णाची सही, छायाचित्रे पाहिल्यानंतर हे प्रस्ताव खोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कंपनीने रुग्णालयाकडे याबाबत चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयाने कंपनीची फसवणूक झाल्याचे लेखी मान्य न केल्यास पोलिसांत गुन्हा दाखल होईल. शहरात अशा प्रकारे कंपनीची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार झाले असून, त्यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र, तरीही अजून असे प्रकार सुरू आहेत. यापुढेही संबंधित रुग्णालयांवर कंपनीकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच त्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ही करू शकतो, असे थोरबोले यांनी सांगितले.
विमा कंपन्यांची फसवणूक
By admin | Published: September 22, 2014 5:25 AM