पुणे : नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या १ हजार रुपयांच्या नोटा दाखवून त्या बदलून देतो, असे सांगून लाखो रुपयांना गंडा घालणारी टोळी पुणे पोलिसांनी उघडकीस आणली असून लष्करातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आण्णासाहेब अर्जुन धायतिडक (रा. रेंजहिल्स, शासकीय निवासस्थान, खडकी, मूळ गाव बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून चलनातून बंद झालेल्या १ हजार रुपयांच्या ५६ नोटा, भारतीय मनोरंजन बँक, व ५०० रुपयांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा, मोटार असा एकूण २७ लाख ३५ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार तानाजी कांबळे यांना आण्णासाहेब धायतिडक हा जुन्या १ हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटा तसेच नकली नोटा घरी बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रेंजहिल्स येथील धायतिडक याच्या घरावर छापा घालून या बाद झालेल्या व बनावट नोटा ताब्यात घेतल्या. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांची ही एक टोळीच असल्याचे उघडकीस आले आहे. धायतिडक हा लष्करात कामाला असून तो दीर्घ रजेवर आल्यानंतर पुन्हा ड्युटीवर गेला नसल्याचे समजते. त्याचा साथीदार नवाब अली हा आपण चित्रपटसृष्टीत काम करत असून शूटिंगसाठी अशा नोटा वापरत असल्याचे दाखवत असे. दरम्यान, दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने धायतिडक याला अधिक तपासासाठी खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
असा रचत असत फसवणुकीचा कटही टोळी एखादे सावज हेरत त्याला एक केंद्र सरकारचे बनावट अध्यादेश दाखवत. आमच्याकडे १ हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगून ते एक व्हिडीओ दाखवत. त्यात ते बनावट नोटांच्या बंडलावर सर्वात वर एक हजार रुपयांची जुनी बाद झालेली नोट लावून लावत. त्यानंतर त्यांना एखाद्या बँकवाल्याला शोधायला सांगत. बँकर आणि २ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणल्यास मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगत. त्यानंतर सर्व व्यवहार करून देतो, आम्हाला त्याबदल्यात कमिशन द्यावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून कमिशनच्या नावाखाली लाखो रुपये लुटत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पुण्यातील एकाला अशाच प्रकारे फसवून त्यांच्याकडून कमिशनपोटी तब्बल ४ लाख रुपये लुबाडले होते. साताऱ्यामध्येही त्यांनी एकाला अशाच प्रकारे लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.