लोणी काळभोर : वाहने भाडेतत्वावर देतो असे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या ३ जणांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. २ कोटी ४० हजार रूपये किंमतीची २८ वाहने भाडयाने घेऊन वाहनांचा परराज्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अविनाश बालाजी कदम ( वय २८ रा. ढोरे फेज ४, जूना फुरसूंगी रोड ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी ( वय ३८, रा. फ्लॅट नं ४०५, युनिटी टॉवर, शिवनेरीनगर, कोंढवा ), ओंकार ज्ञानदेव वाटाणे ( वय २८, रा. मु. पो. हिंगणी बेर्डी, ता.दौंड ) व मोहमद मुजीब मोहमद बसीरउद्दीन ( वय ४८ वर्षे, संतोषनगर, हैद्राबाद, ) यांना अटक करण्यात आली आहे.
कदम हे ओला कंपनीमध्ये स्वताची स्विफ्ट डिझायर कार चालवितात. कार चालवित असताना त्यांची ओळख गिलानी याच्याशी झाली. त्याने तो नोएडा, उत्तर प्रदेश येथील युनायटेड एस एफ सी सर्व्हिस नावाची नेटवर्क टॉवरची कंपनीमध्ये नोकरीस असल्याचे सांगितले. त्या कंपनीमध्ये वाहने भाडेतत्वावर लावतो, असे सांगून अमिष दाखवून १५ मार्च ते २७ जुलै या साडेचार महिन्याच्या कालावधीत कदम व त्यांच्या ओळखीच्या इतरांची एकूण २८ चारचाकी वाहने ताब्यात घेतली. त्या वाहनांची जीपीएस यंत्रणा काढून टाकली व वाहने घेऊन तो फरार झाला होता. कदम यांनी कंपनीबाबत नोएडा ( उत्तर प्रदेश ) येथे जाऊन माहिती काढली असता त्यास अशी कोणतीही कंपनी नसल्याने फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, युनिट ६ करत होते.
१४ ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार कारखेले व मुंढे यांना गोपनीय खबऱ्यामार्फत खबर मिळाली. की सदर गुन्हयातील एक कार ही दौंड बस स्टॅन्ड परिसरामध्ये विक्री करिता येणार आहे. त्यावेळी सापळा रचून ३ जणांना अटक करण्यात आले.